सातारा : साताऱ्यातील गांधी मैदानावर भरणाऱ्या चौपाटीचा विषय तात्पुरता निकाली लागला असला तरी जागेचा लपंडाव काही थांबलेला नाही. सध्या गांधी मैदानावर ठराविक विक्रेत्यांना हातगाड्या लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र उर्वरित विक्रेत्यांनी करायचं काय? हा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. भवानी पेठेत असलेली युनियन क्लबची जागा जर चौपाटीसाठी वापरात आली तर चौपाटीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो. मात्र या जागेबाबत अनेक वर्षांपासून केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.
राजवाडा बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेली ४६ गुंठे जागा पालिकेच्या मालकीची आहे. युनियन क्लबची इमारत वगळता सुमारे २८ गुंठे जागा मोकळी असून, ती वापरात येऊ शकते. याच जागेवर राजवाडा चौपाटीचे स्थलांतर करण्याबाबत प्रशासन स्तरावर हालचाली सुरू होत्या. नगरसेवक व अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी करून मोजणीही केली होती. विशेष म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील या जागेची पाहणी करून त्याचा योग्य वापर करावा अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या; परंतु या जागेवर मध्यंतरी उद्यान विकसित करण्याचा विषय चर्चेस आला. त्यामुळे उद्यान की चौपाटी या गोंधळात चौपाटी स्थलांतरित करण्याचा विषय भरकटून गेला. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात हा विषय पुन्हा चर्चेस आला नाही. या कालावधीत चौपाटीही बंद ठेवण्यात आली.
लॉकडाऊन शिथिल होताच गांधी मैदानावर चौपाटी पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती हातगाडीधारकांनी केली. मात्र पालिका प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांकडून चौपाटीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अखेर दहा महिन्यानंतर उदयनराजे भोसले यांनी नियमांचे बंधन घालून गांधी मैदानावर चौपाटी सुरू करण्यास परवानगी दिली. सद्य:स्थितीला मैदानावर साठ ते सत्तर गाड्या लागू शकतात. मात्र जागेअभावी उर्वरित ३०-३५ हातगाडीधारकांनी करायचं काय? हा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.
(चौकट)
..तर अनेक प्रश्नांना पूर्णविराम
१. युनियन क्लबची जागा प्रशस्त असून, याठिकाणी ये-जा करण्यासाठी चार प्रवेशद्वार आहेत.
२. या ठिकाणी योग्य नियोजन केल्यास शंभरहून अधिक हातगाड्या सहज उभ्या राहू शकतात.
३. असे झाल्यास हातगाडीधारकांच्या जागेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो.
४. गांधी मैदानावरील कार्यक्रमावेळी व्यवसाय सतत बंद ठेवावा लागतो. युनियन क्लबच्या जागेत चौपाटी स्थलांतरित झाल्यास व्यवसाय बारमाही सुरू राहू शकतो.
५. पालिका प्रशासनाने पुढाकार घेतल्यास अनेक प्रश्नांना पूर्णविराम लागू शकतो.
फोटो मेल : युनियन क्लब
राजवाडा बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेली युनियन क्लबची जागा वापराविना अशी पडून आहे. (छाया : जावेद खान)