उरमोडी नदीलगतच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST2021-04-05T04:35:42+5:302021-04-05T04:35:42+5:30
शेंद्रे : सातारा तालुक्यातील सातारा-आसनगाव रस्त्यावरील सोनगाव हद्दीतील उरमोडी नदीलगत असणाऱ्या तीव्र उताराच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे ...

उरमोडी नदीलगतच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण
शेंद्रे : सातारा तालुक्यातील सातारा-आसनगाव रस्त्यावरील सोनगाव हद्दीतील उरमोडी नदीलगत असणाऱ्या तीव्र उताराच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
उरमोडी नदीलगतच्या तीव्र उताराच्या रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. या रस्त्यामधून पाण्याचा निचरा होत असल्याने डांबरीकरण केले तरी, थोड्याच दिवसात हा रस्ता पूर्णपणे उखडून जात असे. यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडत असल्याने या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अंदाजे दोनशे ते तीनशे मीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती व या रस्त्यावरून प्रवास करणे खूप अवघड बनले होते. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत परिसरातील ग्रामस्थांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे मागणी केली होती.
या रस्त्याच्या प्रश्नावर कायमचा तोडगा निघण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे बांधकाम विभागाने रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम ठेकेदाराकडून पूर्णपणे करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. तसेच रस्त्यामधून होणारा पाण्याचा निचरा पूर्णपणे बंद केला आहे. या रस्त्याच्या कामामुळे स्थानिक नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्न कायमचा मिटला असून, परिसरातील ग्रामस्थ व वाहनधारकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
चौकट
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनेनुसार सातारा-आसनगाव रस्त्यावरील उरमोडी नदीलगतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना कोणत्याही अडचणींचा सामना न करता या रस्त्यावरील वाहतूक आता पूर्णपणे सुरक्षित झाली आहे.
- ॲड. विक्रम पवार
सभापती, सातारा बाजार समिती
०४शेंद्रे :
सातारा-आसनगाव रस्त्यावरील उरमोडी नदीलगतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.