संकल्पनांना बहर; रुसला गुलमोहर !
By Admin | Updated: April 22, 2016 01:02 IST2016-04-21T22:38:44+5:302016-04-22T01:02:04+5:30
अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळांनी होरपळताना पाहून गुलमोहराचाही धीर खचलाय. शहरालगत असलेल्या पॉवर हाउस टेकडीवरचे दोन-पाच गुलमोहर काहीसे बहरलेत;

संकल्पनांना बहर; रुसला गुलमोहर !
राजीव मुळ्ये --सातारा --माथ्यावरील रक्तवर्णी फुलांच्या बहराने एरवी वैशाखवणव्याला आव्हान देणारा गुलमोहर यंदा जणू हिरमुसलाय. साहित्यिक, कलावंत आणि पर्यावरणप्रेमी गुलमोहर दिनाच्या तयारीत गुंतले असताना, नवनवीन संकल्पनांना बहर आलेला असताना ‘उत्सवमूर्ती’ गुलमोहर मात्र रुसून कोपगृहात बसलाय. कुणाला कामगार दिन म्हणून तर कुणाला महाराष्ट्र दिन म्हणून एक मे या दिवसाची प्रतीक्षा असते. सातारकर मात्र गेल्या सोळा-सतरा वर्षांपासून या तारखेची वाट बघतात ती गुलमोहर दिनासाठी. कोलकत्याचा ‘रेड स्ट्रीट’ साताऱ्यात आणण्याची जिगीषा बाळगणाऱ्या कला-निसर्गप्रेमींनी हा आगळा उत्सव सुरू केला, त्यावेळी ऐतिहासिक राजवाडा इमारतीच्या चौकात, मराठा आर्ट गॅलरीसमोरच्या गुलमोहराला पाणी घालण्यात आले. मात्र, नक्षीदार राजवाडा इमारतीसह आर्ट गॅलरीतील दुर्मिळ चित्रांची सद्य:स्थिती गुलमोहर दिनात सहभागी होणाऱ्या चित्रकारांपासूनही लपलेली नाही. त्यांच्याही चित्रांची प्रदर्शनं कधीकाळी पाहणारी ही गॅलरी आज उजाड होऊन बसलीय. निसर्गचित्रं काढण्यासाठी पश्चिमेकडच्या डोंगरांवर जावं, तर तिथली वाढती ‘काँक्रिटी शिल्पं’ चित्रकारांना ‘होराइझन लाइन’ मिळू देत नाहीत आणि चित्रकार हिरमुसून जातात. त्यांच्या मनाला काहीशी उभारी देणारा गुलमोहराचा उत्सव आता आठवड्यावर येऊन ठेपलाय; पण... हाय रे हाय..!सातारचा ‘रेड स्ट्रीट’ मानल्या गेलेल्या रस्त्याची पाहणी केली तेव्हा अभावानंच एखादा गुलमोहर फुललेला दिसला. बहुसंख्य झाडांवर लटकतायत वाळून काळ्याकभिन्न पडलेल्या शेंगा. जवळच्याच शाळेची पोरं त्या नाचवतायत तलवारी समजून अन् वाजवतायत खुळखुळा समजून! फुलं सोडाच; अनेक झाडांवर पालवीही उरलेली नाही. ‘खराटे’ झालेल्या झाडांनी यंदा तीव्र सूर्यकिरणांपुढं हात टेकलेत. अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळांनी होरपळताना पाहून गुलमोहराचाही धीर खचलाय. शहरालगत असलेल्या पॉवर हाउस टेकडीवरचे दोन-पाच गुलमोहर काहीसे बहरलेत; पण शहरातल्या बहुतांश झाडांनी यंदा लाल-केशरी फुलांचा ‘फेटा’ अजून बांधलेलाच नाही. निसर्गमित्र, कलावंत, कवी असे सगळेच वाट पाहत असले, तरी एक मेपर्यंत परिस्थितीत फारसा बदल होण्याची चिन्हं नाहीत.‘गुलमोहर दिन’ साजरा होण्यास सुरुवात झाल्यापासून या उत्सवाच्या स्वरूपात अनेक बदल झालेत आणि त्यातला सहभागही क्रमश: वाढतच गेलाय. कवींसाठी व्यासपीठ, चित्रकार-छायाचित्रकारांसाठी स्पर्धा याखेरीज या दिनाने मांडणशिल्पासारखे नवनवीन कलाप्रकार सातारकरांच्या समोर आणलेत. गेल्या वर्षी तर सह्याद्रीच्या जैवविविधतेची माहिती देणारं फिरतं प्रदर्शनही खास पुण्याहून साताऱ्यात आणलं गेलं. कलास्वादासोबत जिज्ञासापूर्तीचा हेतू यामागे होता. गेल्या काही वर्षांपासून परजिल्ह्यातून येणारे पाहुणे आणि परजिल्ह्यात गेलेल्या सातारकरांची या सोहळ्याला उपस्थिती वाढतेय.
यावर्षीही सर्व कलावंत, रसिक, निसर्गपूजक एकत्र येऊन गुलमोहर दिनाच्या तयारीत गुंतले आहेत. उत्सवात कुणी कोणती कविता म्हणायची, कुणी गाणं म्हणायचं, कुणी वाद्यवादन करायचं, कुणी शिल्पं साकारायची, कुणी कोणतं चित्र काढायचं याचं नियोजन जोरात सुरू आहे. कामाधामानिमित्त पुण्या-मुंबईत स्थायिक झालेले अनेक सवंगडी कधी यायचं आणि कोणत्या तयारीनिशी यायचं, याचं प्लॅनिंग करू लागलेत. येत्या आठवड्याभरात ही प्रक्रिया आणखी वेग घेईल. गेल्या वर्षीपेक्षा अधिक ‘इव्हेन्ट्स’ कसे होतील, याचे आराखडे तयार केले जातील. काहीजण खास या दिवसासाठी नवीकोरी कविता, चित्र, शिल्प तयार ठेवतील. संकल्पना अन् प्रतिभांना अधिकाधिक बहर येईल; मात्र ज्याच्यासाठी ही तयारी, तो गुलमोहर मात्र येत्या आठवड्यात खुळखुळ्या
शेंगांच्या भाराने अधिकच वाकलेला असेल, हे स्पष्ट झालंय.
काही सवंगड्यांना मात्र दिसू लागलेत पश्चिमेकडचे डोंगर, त्यावरील अनिर्बंध बांधकामं, विघ्नसंतोषींकडून लावले जाणारे वणवे, वन्यजीवांच्या वाटा रोखणारी काटेरी कुंपणं, खाद्याच्या शोधात डोंगरी भाग सोडून सपाटीला येऊ लागलेले वन्यजीव अन् अपरिचित भागात पायाला झालेली जखम भरून न आल्याने उसाच्या शेतात मरून पडलेला गवा. कचरा डेपोवर जमणाऱ्या कुत्र्यांवर गुजराण करणारे अन्् हायवे ओलांडताना वाहनांची शिकार ठरणारे बिबटे. कधीकाळी यांच्यासाठीच हे सवंगडी प्राणपणानं लढले. नवीन महाबळेश्वरची टूम हद्दपार करून जंगलाचं जंगलपण राखलं. बॉक्साइटचं उत्खनन रोखताना लाल मातीत बड्यांशी कुस्ती खेळली. जागतिक वारसास्थळ ठरलेल्या कास पठारावर मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी समूहशक्ती पणाला लावली. निसर्गचक्र दोलायमान होत असताना वर्षातून एक दिवस नव्हे, वर्षभर एकत्र या... पुन्हा एकदा संघर्षाचं समूहगीत गा, एकीचं समूहचित्र रेखाटा असंच रुसलेला गुलमोहर अप्रत्यक्षरीत्या सुचवतोय, असं काही सवंगड्यांना मनापासून वाटू लागलंय.