फेब्रुवारीत ‘रचना’ वास्तू प्रदर्शन
By Admin | Updated: January 7, 2015 23:25 IST2015-01-07T22:54:34+5:302015-01-07T23:25:38+5:30
‘बीएआय’चे आयोजन : पन्नास कोटींची होणार साताऱ्यात उलाढाल

फेब्रुवारीत ‘रचना’ वास्तू प्रदर्शन
सातारा : बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या (बीएआय) सातारा शाखेने दि. १४ ते १७ फेबु्रवारी या कालावधीत ‘रचना २०१५’ हे वास्तू प्रदर्शन आयोजित केल्याची माहिती अध्यक्ष रामदास जगताप आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथील बिल्डर्स उत्सुक असून, दीड लाखाहून अधिक लोक भेट देतील, असे स्पष्ट करतच या माध्यमातून पन्नास कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जगताप म्हणाले, ‘सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर होणारे ‘रचना २०१५’ प्रदर्शन रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या दिग्गजांपासून ते आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारणाऱ्या माणसांसाठी पर्वणीच आहे. यंदाचे प्रदर्शनाचे सातवे वर्ष असून, दरवर्षी मिळणारा प्रतिसाद वाढता आहे.’
‘रचना २०१५’ मध्ये सजावट, फर्निचर, टाईल्स, किचन अॅक्सेसरीज, इलेक्ट्रिकल फिटिंग त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिकांसाठी नवीन साहित्य, सॉफ्टवेअर्स येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रदर्शनात फायनान्स कंपन्याही सहभागी होणार आहेत. अन्य काही कंपन्याही यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
‘रचना २०१५’ मध्ये रिअल इस्टेट व्यावसायिक आणि बांधकाम व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या कंपन्या सहभागी होणार आहेत. ग्राहकांना खात्रीची आणि विश्वासाची सेवा मिळावी, हाच बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडियाचा उद्देश आहे. या प्रदर्शनास प्रत्येक सातारकरांनी भेट द्यावी, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.
पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष सचिन देशमुख, सचिव अभिजित पाटील, खजिनदार संतोषकुमार जगताप, समिती सदस्य सुधीर घार्गे, संजय खटावकर, कार्यकारी समिती सदस्य सलीम कच्छी, राजेश माने, सयाजी भोसले, सागर निंबाळकर, किशोर लोखंडे, देवेन गिजरे, जनार्दन कदम उपस्थित होते. (प्रतिनिधी)