तक्रार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:15 IST2021-02-05T09:15:31+5:302021-02-05T09:15:31+5:30
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात जगताप यांनी म्हटले आहे की, संस्थापक पॅनलचे प्रमुख प्रशांत पवार यांनी कृष्णा कारखान्याने बनावट ...

तक्रार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा!
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात जगताप यांनी म्हटले आहे की, संस्थापक पॅनलचे प्रमुख प्रशांत पवार यांनी कृष्णा कारखान्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०० पेक्षा जास्त व्यक्तींना सभासद देण्यात आल्याचा आक्षेप घेत, याबाबत चौकशी करण्याच्या मागणीचा अर्ज कऱ्हाड पोलीस ठाण्यात दिला आहे. मुळात जी बाब सहकार खात्याच्या अखत्यारित आहे, त्याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल करायला जाणे म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे. वास्तविक अविनाश मोहिते यांच्या कार्यकाळात कुणाच्या इशाऱ्याने कारखाना चालविला जात होता, याची चांगलीच माहिती प्रशांत पवार यांना आहे. याच काळात २९० लोकांना बोगस कागदपत्रांच्या आधारे कारखान्याचे सभासदत्व दिल्याचे समोर आले आहे. यातील अनेक लोकांकडे कारखाना प्रशासनाने गेल्या दीड वर्षापासून पत्रव्यवहार करून, कागदपत्रांची रितसर मागणी केलेली आहे. पण यातील अनेकांकडून कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही. याबाबतची तक्रार सहकार खात्याकडे दाखल झाली आहे. त्याबाबत चौकशीही सुरू आहे. स्वत:च्या पॅनलच्या कार्यकाळातील सभासद अपात्र ठरल्यास स्वत:च्या बोगसपणावर शिक्कामोर्तब होईल, याची भीती वाटू लागल्यानेच संस्थापक पॅनलने मार्च २०१६ ते ऑगस्ट २०१८ या काळात नोंदविलेले सभासद बनावट असल्याची खोटी आवई उठविण्यास प्रारंभ केला. याबाबत त्यांनी अगोदरच सहकार खात्याकडे तक्रार केली असून, त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन सहकार खाते याबाबतची पडताळणी करत आहे. पण त्यांचा निवाडा येण्याअगोदरच संस्थापक पॅनलचे प्रशांत पवार यांनी पोलिसांत धाव घेणे म्हणजे हास्यास्पद आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.