सातारा गटशिक्षणाधिकाऱ्यांवर विनयभंगाची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST2021-06-29T04:26:25+5:302021-06-29T04:26:25+5:30
सातारा : सातारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्याविरोधात विनयभंगाची लेखी तक्रार दिल्यानंतर त्याची चौकशी विशाखा समितीकडून सुरू असताना ...

सातारा गटशिक्षणाधिकाऱ्यांवर विनयभंगाची तक्रार
सातारा : सातारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्याविरोधात विनयभंगाची लेखी तक्रार दिल्यानंतर त्याची चौकशी विशाखा समितीकडून सुरू असताना शिक्षिकेने पोलिसांकडे धाव घेतली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी धुमाळ यांना ताब्यात घेतले आहे.
सातारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असणारे संजय धुमाळ त्यांच्या अख्यात्यारीत असणाऱ्या एका शाळेतील शिक्षिकेला कामाच्या माध्यमातून जवळीक वाढवत शरीरसुखाची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप संबंधित शिक्षिकेने केला आहे. कोणतेही काम नसताना शाळेत येऊन एकटक बघत बसणं, वारंवार फोन करणे, गाडीतून सोबत येण्यासाठी दबाव आणणे, तुझ्या विरोधातील तक्रारी निकाली काढतो, असे धुमाळ म्हणायचे, असेही या तक्रारीत म्हटले आहे. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी याबाबत पंचायत समितीतील विशाखा समितीकडे पाठवून देत चौकशी करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांना दिल्या होत्या. त्यानुसार चौकशीची प्रक्रिया सुरू असतानाच या प्रक्रियेला छेद देत शिक्षिकेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. प्रकृती बिघडल्याने धुमाळ यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.