माजी सैनिकाच्या पत्नीची खासगी सावकारीविरोधात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:42 IST2021-02-09T04:42:06+5:302021-02-09T04:42:06+5:30
फलटण : खासगी सावकाराकडून अडचणीच्या काळात २ लाख १० हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात सावकाराकडून ३२ लाखांची मागणी ...

माजी सैनिकाच्या पत्नीची खासगी सावकारीविरोधात तक्रार
फलटण : खासगी सावकाराकडून अडचणीच्या काळात २ लाख १० हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात सावकाराकडून ३२ लाखांची मागणी करण्यात आली. तसेच शेतजमीन परस्पर नावावरही करुन घेतली. त्यानंतर मारहाण करत असल्याचा आरोप निंबळक, ता. फलटण येथील माजी सैनिकाची पत्नी प्रभावती बाबूराव ढमाळ यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी खासगी सावकारीविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत दिलेल्या तक्रार अर्जात प्रभावती ढमाळ यांनी म्हटले आहे की, त्यांना सोरायसीस हा त्वचेचा आजार असून औषधोपचारासाठी त्यांनी नवनाथ सदाशिव राणे या खासगी सावकाराकडून ४ फेब्रुवारी २०१४ रोजी २५ हजार रुपये त्यानंतर सून नीलम ढमाळ यांना पॅरालिसिसचा अॅटॅक आल्याने औषधोपचारासाठी २१ ऑगस्ट २०१४ रोजी ५० हजार आणि २ मार्च २०१५ रोजी रानातल्या पाइपलाइनच्या कामासाठी १ लाख ३५ हजार असे एकूण २ लाख १० हजार दहा टक्के व्याजाने घेतले होते. संबंधित सावकाराने ‘तुमच्याकडून ३२ लाख रुपये येणे आहे,’ असे सांगून साडेतीन एकर जमीन माझ्याकडे मुदत खरेदीने द्या, असे सांगून मुदत खरेदीसाठी नेले. परंतु प्रत्यक्षात शब्दात फसवणूक करून संबंधित जमीन कायम खूश खरेदीने त्याचे वडील सदाशिव अर्जुन राणे यांच्या नावावर करून घेतली. ही बाब लक्षात आल्यानंतर ढमाळ यांनी हरकत घेतली असता ‘तुम्ही पैसे दिल्यावर जमीन परत फिरवून देतो,’ असे नवनाथ राणे याने सांगितले.
ढमाळ व त्यांचे कुटुंबीय वारंवार नवनाथ राणे याला रक्कम देण्यास गेल्यावर त्याने ३२ लाख रुपये परत दिल्याशिवाय जमीन परत देणार नाही, असे सांगितले. त्यानंतर ढमाळ यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितल्यावर राणे याने तीन एकरापैकी दीड एकर जमीन ढमाळ यांच्या सुनेच्या नीलम विनायक ढमाळ यांच्या नावावर फिरवून दिली. त्यानंतर पैशासाठी नवनाथ राणे वारंवार मारहाण करून छळ करत आहे.