जखमी ‘हरियाल’ला वाचविण्यात अपयश मदत न मिळाल्याने मृत्यू झाल्याची तक्रार
By Admin | Updated: November 14, 2014 23:19 IST2014-11-14T22:33:16+5:302014-11-14T23:19:20+5:30
या पक्ष्याला वाचविण्यासाठी या विद्यार्थ्यांनी केलेली मोठी धावपळ व्यर्थ ठरली.

जखमी ‘हरियाल’ला वाचविण्यात अपयश मदत न मिळाल्याने मृत्यू झाल्याची तक्रार
सातारा : महाराष्ट्राचा राज्यपक्षी असलेल्या ‘हरियाल’ पक्ष्याला जखमी अवस्थेत वेळेवर मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार, त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी केली. महाविद्यालयाच्या जवळपास जखमी अवस्थेत सापडलेल्या या पक्ष्याला वाचविण्यासाठी या विद्यार्थ्यांनी केलेली मोठी धावपळ व्यर्थ ठरली. याबाबत हकीकत अशी, शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील काही विद्यार्थी चहा घेण्यासाठी बाहेर आले. ‘एमपीएससी’चा अभ्यास करण्यासाठी हे विद्यार्थी रोज सकाळी महाविद्यालयात येतात. परिसरातील गर्द झाडीत त्यांना काही हालचाल दिसल्याने हे विद्यार्थी झाडीकडे गेले. जखमी अवस्थेत धडपडत असलेला हरियाल पक्षी त्यांना दिसला. गर्द झाडीत मोठ्या कष्टाने शिरून त्यांनी पक्ष्याला ताब्यात घेतले. या प्रयत्नात एका विद्यार्थ्याला काटेही लागले. पक्ष्याला घेऊन सचिन जाधव, अतुल जाधव, गुरुदेव फाळके, अशोक राठोड, गौरव जमदाडे, सचिन काळेल हे विद्यार्थी वनखात्याच्या गोडोली येथील कार्यालयात गेले. परंतु तेथील व्यक्तींनी डॉक्टर नसल्याचे सांगितले. पक्ष्याला घेऊन विद्यार्थी सरकारी पशुचिकित्सालयाकडे गेले. मात्र, या प्रयत्नांना यश आले नाही आणि पक्ष्याचा मृत्यू झाला. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी किमान या पक्ष्याला ताब्यात घ्यायला हवे होते, असे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. वेळेत मदत न मिळाल्यानेच त्याचा मृत्यू झाला, अशी तक्रार त्यांनी उपवनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांच्याकडे केली. (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी हरियाल पक्ष्याला गोडोली रोपवाटिकेत आणले तेव्हा तेथे कर्मचारी उपस्थित नव्हते. केवळ वनमजूर तेथे काम करत होते. ते या पक्ष्याला ताब्यात घेऊ शकत नाहीत. कर्मचारी असते, तर त्यांनी पक्ष्याला नक्की ताब्यात घेतले असते. - एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक, सातारा