पावसासाठी सामुदायिक नमाजपठण

By Admin | Updated: July 18, 2015 00:17 IST2015-07-17T22:08:16+5:302015-07-18T00:17:55+5:30

कऱ्हाड : ईदगाह मैदानावर शेकडो बांधवांची उपस्थिती

Community namazapatan for rain | पावसासाठी सामुदायिक नमाजपठण

पावसासाठी सामुदायिक नमाजपठण

कऱ्हाड : पावसाने पाठ फिरविल्यामुळे राज्यावर दुष्काळाचे संकट ओढावले आहे. हे संकट दूर करण्यासाठी आणि पावसासाठी ‘अल्लाह’कडे साकडे घालण्यासाठी शुक्रवारी शेकडो मुस्लीमबांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले. येथील ईदगाह मैदानात दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आलेल्या या नमाजसाठी मुलांसह शेकडो मुस्लीमबांधव उपस्थित होते.
यावर्षी वळवाने ठिकठिकाणी दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतीसाठी पोषक वातावरण तयार झाले. त्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीलाही मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. जूनच्या मध्यंतरापर्यंत मान्सूनपूर्व व मान्सून पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे पिकांचीही चांगली उगवण होऊन शिवाराने हिरवा शालू पांघरला. मात्र, त्यानंतर अचानक पावसाने दडी मारली आहे. गत महिनाभरापासून राज्यात कोठेही पाऊस झालेला नाही. दुष्काळी भागासह अती पर्जन्यवृष्टीहोणारा भागही सध्या कोरडाठाक आहे. या परिस्थितीत पिकांनीही माना टाकायला सुरुवात केली असून, आणखी काही दिवस हीच परिस्थिती राहिल्यास संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. प्रत्येकजण चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असताना पावसाने मात्र ओढ दिली आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कऱ्हाडात मुस्लीम बांधवांच्या वतीने सामुदायिक नमाज पठण आयोजित करण्यात आले होते. सध्या मुस्लीमबांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, शनिवारी ‘रमजान ईद’ साजरी होत आहे. ईदच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात
आलेल्या सामुदायिक नमाज पठणसाठी लहान मुलांसह शेकडो मुस्लीमबांधव उपस्थित होते. ईदगाह मैदानावर बांधवांनी ‘अल्लाह’ला पावसासाठी ‘दुआँ’ मागितली. (प्रतिनिधी)

Web Title: Community namazapatan for rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.