इच्छुकांचा भर ‘कम्युनिटी मीटिंग’वर

By Admin | Updated: September 25, 2014 00:19 IST2014-09-24T23:28:25+5:302014-09-25T00:19:45+5:30

इव्हेन्ट मॅनेजर सरसावले : एकगठ्ठा मतदानासाठी वेळेचा सदुपयोग

On the 'Community Meeting' | इच्छुकांचा भर ‘कम्युनिटी मीटिंग’वर

इच्छुकांचा भर ‘कम्युनिटी मीटिंग’वर

प्रगती जाधव-पाटील - सातारा  -प्रचाराच्या सुरूवातीलाच एकगठ्ठा मतदारांना भेटण्याचा उमेदवरांचा फंडा चांगलाच रंगू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज रात्रीची उमेदवारांनी ‘सोसायटी मीटिंग’वर भर दिला आहे.
जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी विरोधी उमेदवाराचा चेहरा स्पष्ट झाला नाही. त्यामुळे उमेदवार वैयक्तिक गाठीभेटी आणि मेळाव्याच्या माध्यमातून प्रचार करण्यात मग्न आहेत. विरोधकांचा चेहरा स्पष्ट झाला की मग जाहीर सभा, कोपरा सभा, प्रभाग बैठका या माध्यमातून टीका सुरू होऊन मग प्रचारात रंगत येणार आहे.
सध्या हातात असलेल्या पुरेशा वेळेचा सदुपयोग करत उमेदवारांनी सध्या कम्युनिटी मीटिंगवर अधिक भर दिला आहे. एकाच वेळी एकाच ठिकाणी अनेक लोक भेटत असल्यामुळे एकगठ्ठा त्यांच्याशी संवाद साधणं उमेदवाराला सोपे जात आहे.
कम्युनिटी मीटिंगसाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर कामाला लागले आहेत. उमेदवाराची वेळ आणि कम्युनिटी पदाधिकाऱ्यांच्या वेळा निश्चित करून त्यांचे सर्व नियोजन करणे, त्यात कुठेही त्रुटी न ठेवणे आणि कोणाचीही तक्रार येऊ न देणं हे शिवधनुष्य त्यांना पेलावे लागत आहे.
या बैठकांसाठी सभागृहापासून जेवणाचा ‘मेन्यू’ ठरविण्यापर्यंत सर्वकाही संबंधित कम्युनिटीचा नेता बघतो. इच्छुक उमेदवारापुढे त्याचे वजन वाढेल, इतकी गर्दी जमविणे हे त्याचं काम असतं. त्यामुळे उमेदवाराने येऊन फक्त संवाद साधणे एवढेच काम शिल्लक ठेवले जाते. या बैठकांना सध्या कार्यकर्ते चांगलीच गर्दी करत आहेत.

हे मेळावे कशासाठी...
निवडणुका साधारण महिनाभर आधी जाहीर होतात. अशावेळी रात्र कमी आणि सोंगे फार अशी गत उमेदवाराची होते. एकीकडे पूर्ण मतदारसंघ पिंजून काढावा लागतो, तर दुसरीकडे मतदारांना भेटण्यासाठी वेळही द्यावा लागतो. अशा दिवसांत २४ तासही पुरत नाहीत. अशा वेळी एकाच व्यवसायातील सर्वजण एकत्र आले तर त्यांच्या समस्या आणि अपेक्षा ऐकून तोडगा काढण्यात येतो. याबरोबरच संबंधितांच्या मार्फतही प्रतिमा निर्मितीचे काम होते. त्यामुळे एकाच वेळेला शेकडो मतदारांशी संवाद साधता येतो आणि त्यांचे काम कमी होते.

इव्हेंट मॅनेजमेंटचीही मदत
एका महिन्यात मोठ्या प्रमाणावर प्रचार सभा, संपर्क दौरा, मेळावा आणि मतदार संवाद यावर उमेदवरांना भर द्यावा लागतो. अनेकदा सोबत असलेले कार्यकर्तेही अतिरिक्त जबाबदारीमुळे घायाळ झालेले दिसतात. या सर्वांनाच कामातून थोडी सवड मिळावी आणि त्यांच्या कामाला न्याय मिळावा म्हणून काही उमेदवारांनी त्यांच्या दौऱ्यांचे नियोजन, त्यासाठी आवश्यक गाडी आदि गोष्टी तय्यार ठेवण्यासाठी हे काम इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिले आहे. यामुळे कार्यकर्त्यांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी झाला आहे.

हे आहेत टार्गेटवर
वकील, डॉक्टर्स, इंजिनियस, उद्योजक,मेडिकल असोसिएशन ,
शिक्षक, क्रीडा संघटना, प्राध्यापक, हॉटेल व्यावसायिक,कपडा, व्यापारी, व्यावसायिक

Web Title: On the 'Community Meeting'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.