परळी खोऱ्यातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:41 IST2021-09-18T04:41:47+5:302021-09-18T04:41:47+5:30
परळी : परळी खोऱ्यातील समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध करून ...

परळी खोऱ्यातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध
परळी : परळी खोऱ्यातील समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे आणि रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येईल, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
सावली (ता. सातारा) हे गाव नवसाला पावणाऱ्या सावलीच्या राजामुळे पंचक्रोशीत नावारूपाला आले आहे. सावलीच्या राजाच्या नूतन मंदिराचा भव्य जीर्णोद्धार व कलशारोहण कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, शिवसह्याद्रीचे संस्थापक भाई वांगडे, तानाजी भगत, राजू फडतरे, श्रीरंग देवरुखे, महेंद्र देवरे, मंडळाचे अध्यक्ष जनार्धन साळुंखे, पांडुरंग साळुंखे, रमेश साळुंखे, राजू साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, परळी भागासाठी शक्य तितका निधी उपलब्ध करुन विकासकामे करण्याचा मानस आहे. त्याच अनुषंगाने पावसाची उघडीप मिळताच ऑक्टोबर महिन्यापासून परळी भागातील सर्व रस्त्यांची डागडुजी व डांबरीकरण करण्यास सुरुवात होईल. सावली गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा लवकरच मार्गी लावू तसेच वेगळी पाण्याची टाकीदेखील बांधून घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. याचबरोबर लावंघर-पाणीउपसा पाणी योजना मार्गी लावून लावंघर, करंजे, मस्करवाडी अशा अनेक गावांना पाणी हे मुबलक प्रमाणात मिळेल.
नवनवीन उपक्रम राबवून सावली येथील मंडळाने भागात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिर, चष्मा शिबिर, संगणक वाटप वह्या वाटप केल्या. यावेळी शंकर साळुंखे, रामचंद्र साळुंखे, सूर्यकांत साळुंखे तसेच सजावट करणारे नामदेव शिंदे, प्रकाश पाटील, दत्ता साळुंखे, तानाजी साळुंखे, शिवाजी साळुंखे, विलास साळुंखे गावातील सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थित कार्यक्रमाची सांगता झाली.
चौकट
परळी भागात शिवेंद्रराजेंचा झंझावात
आमदार शिवेंद्रराजेंनी गणपती आगमनापासून परळी भागात झंझावात सुरू केला आहे. गावोगावी भेटी देऊन तेथील अडचणी समस्या जाणून घेत त्यावरील उपाययोजना यावर मुंबई मंडळ तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली जात आहे.