सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST2021-02-05T09:14:22+5:302021-02-05T09:14:22+5:30
कऱ्हाड : कोरोना महामारीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी भागीदारी करत व आपल्या सुविधा कोरोना उपचारांसाठी समर्पित करणाऱ्या सह्याद्री ...

सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाचा प्रारंभ
कऱ्हाड : कोरोना महामारीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी भागीदारी करत व आपल्या सुविधा कोरोना उपचारांसाठी समर्पित करणाऱ्या सह्याद्री रुग्णालयाने आजअखेर १ हजार १००हून अधिक कोरोना रूग्णांवर उपचार केले आहेत. या रूग्णांसाठी सातत्याने काम करणाऱ्या या रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.
यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक दिलीप चव्हाण, अमित चव्हाण, व्यवस्थापक डॉ. व्यंकटेश मुळे व मार्केटिंग प्रमुख विश्वजीत डुबल आदी उपस्थित होते. व्यवस्थापक डॉ. व्यंकटेश मुळे म्हणाले की, कोरोना महामारीचा काळ हा सर्वांसाठीच कठीण होता. गतवर्षी महामारी घोषित झाली तेव्हा या विषाणूबाबत जगभरात फारशी माहिती नव्हती. त्यामुळे कोरोनाचा लोकांवर होणारा प्रभाव, उपचार, एकंदर शहरातील वैद्यकीय यंत्रणेचे व्यवस्थापन या सर्व मोठ्या आव्हानात्मक गोष्टी होत्या. अशा काळात स्थानिक प्रशासन आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन अहोरात्र काम करत या संकटाचा सामना केला. त्याला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. म्हणूनच आपण सर्व या संकटातून हळूहळू बाहेर पडत आहोत. अशा वेळेस लस उपलब्ध होणे, हा आशेचा किरण असून, लवकरच आपण या संकटातून पूर्णपणे बाहेर पडू, असे संकेत आता मिळत आहेत. रूग्णांसाठी काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे हे अत्यंत समाधानकारक आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा सुनिश्चित होण्यास मदत होईल. लवकरच सर्व नागरिकांसाठी आमच्या रुग्णालयाला अधिकृत लसीकरण केंद्र म्हणून परवानगी मिळेल. त्यानंतर समाजातील सर्वांसाठी लसीकरण सुविधा खुली करण्यात येईल.
फोटो : ३०केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाड येथे सह्याद्री रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे.