घरांची पडझड, बंधारा वाहून गेला
By Admin | Updated: August 3, 2014 22:44 IST2014-08-03T21:36:30+5:302014-08-03T22:44:45+5:30
काळोशीत पावसाचा हाहाकार : अतोनात नुकसान

घरांची पडझड, बंधारा वाहून गेला
घरांची पडझड, बंधारा वाहून गेला
काळोशीत पावसाचा हाहाकार : अतोनात नुकसान
परळी : परळी खोऱ्यातील काळोशी या गावातील कृषी विभागाच्या पाणलोट समितीतून बांधण्यात आलेल्या तीन लाखांचा बंधारा वाहून गेला आहे. हा बंधारा तीन महिन्यांपूर्वी बांधला होता. तो वाहून गेल्याने बंधाऱ्याखालील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्य शासनाच्या वतीने सर्वत्र कृषी विभागाच्या माध्यमातून पाणलोट समितीची स्थापना करून विकास करण्याचे हाती घेतले पडिक जमिनीचे सपाटीकरण त्या सुपीक बनविणे, त्यांना बारा महिने पाणी मिळावे म्हणून दऱ्या, बंधारे बांधणे असे पाऊल उचलले. असाच बंधारा परळी खोऱ्यातील काळोशी गावात गेल्या तीन महिन्यांपूर्वी वाघजाई-काळंबा पाणलोट समितीच्या माध्यमातून बंधारे घटक विशेष निधीतून मागासवर्गीय लोकांसाठी बांधण्यात आला. परंतु सुमारे तीन लाख रुपये खर्च केलेला निधी जोरदार पाऊस आल्याने पाण्यात वाहून गेला आहे.जोरदार पाऊस आल्याने हा बंधारा वाहून गेला; परंतु हा बंधाऱ्याखाली असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी व माती वाहून गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामध्ये किसन निकम, विष्णू निकम, जोतिराम निकम या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी
शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. (वार्ताहर)
बोरणे घाटात दरडी कोसळणे सुरूच
परळी : ठोसेघर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे बोरणे घाटात छोट्या-छोट्या दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच असून, धबधबा पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.गेल्या महिन्यांपासून ठोसेघर, परळी परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धबधबा ओसंडून वाहत आहे. धबधबा पाहण्यास जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून पर्यटक येत आहेत. परंतु जोरदार पाऊस असल्याने सातारा-ठोसेघर रस्त्यावरील बोरणे घाटात छोट्या-छोट्या दरडी कोसळ्याचे सत्र सुरूच आहे. या दरडीमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. छोटे-छोटे दगड, मातीचे ढिगारे रस्त्यावर असल्याने पर्यटकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्याशेजारील नाल्यामध्ये माती पडल्याने पावसाचे पाणी पूर्ण रस्त्यावरून जात असल्याने दुचाकी चालकांच्या अंगावर चिखल उडाल्याने त्यांच्यामध्ये वादावादी होत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने त्वरित जेसीबीच्या साह्याने काढण्यात यावी, अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.
बोरणे घाटातील रस्ता खचल्याने काही दिवस ठोसेघर, जांबे परिसरातील एस.टी. बसेस सेवा बंद होती. परंतु, ती सेवा शनिवारी पासून सुरू झाली आहे. (वार्ताहर)