खोक्यात ‘गाळा’ अन् गाळ्यात ‘खोका’
By Admin | Updated: December 10, 2014 23:44 IST2014-12-10T22:42:11+5:302014-12-10T23:44:24+5:30
सातारा बाजार समिती : मनवेला सापडला होता पैसे कमविण्याचा ‘राजमार्ग’

खोक्यात ‘गाळा’ अन् गाळ्यात ‘खोका’
सातारा : लेखनिक ते सचिव असा प्रवास राहिलेल्या रघुनाथ वामन मनवेचे सातारा शेती उत्पन्न बाजार समितीतील किस्से आता समोर येऊ लागले आहेत. त्याने शेती उत्पन्न समितीत चक्क ‘बाजार’च मांडला होता, असे अनेक शेतकरी, व्यापारी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सांगतात. खोक्यात ‘गाळा’ अन् गाळ्यात ‘खोका’ अशी त्याची कार्यपध्दती होती. त्याला पैसे कमविण्याचा ‘राजमार्ग’च सापडला होता.
सातारा शेती उत्पन्न बाजार समितीला एक इतिहास आहे. किसन वीर यांनी येथे सभापती म्हणून आपली कारर्किद गाजविली आहे. बाबुराव घोरपडे, प्रल्हादभाऊ चव्हाण, गुरूप्रसाद सारडा यांनी खऱ्या अर्थाने येथे शेतकरी हित जपले. मात्र येथे लेखनिक म्हणून रुजू झालेल्या या पट्ट्याने सर्व बारकावे टिपत सचिव होण्यापर्यंत मजल तर मारलीच त्याचबरोबर कोटींची माया जमविण्याची किमयाही साध्य केली. लाचलुचपत विभागाने मनवेची मालमत्ता ३५ लाखांच्या आसपास असल्याचे स्पष्ट केले असलेतरी त्याचा ‘शिवराज’ बंगला पाहिल्यानंतर आणि परदेश वारीचा हिशोब लक्षात घेता हा आकडा पाच ते सहा कोटींच्या घरात जातो. सातारा शेती बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांशी उध्दट वर्तन, त्यांच्याशी सुरु असणारी अरेरावी, कोणाच्यातरी नावावर पैसे उकळणे हे हे तर नित्याचाच भाग बनले होते. यापूर्वी बाजार समितीमध्ये दोन व्यापाऱ्यांचे गाळे सील केले होते. यापैकी एका व्यापाऱ्याला जणू बक्षिसी देत सील केलेल्या गाळ्याशेजारीच अन्य एक दुसरा गाळा देऊ केला होता. ज्यांचे परवाने रद्द केले त्यांनाच दुसरा गाळा भेट, याचा ‘अर्थ’ कशा प्रकारे लावला, असा सवालही त्यावेळी शेतकरी संघटनांच्या काही प्रतिनिधींनी केला होता.
सचिव रघुनाथ मनवे यास लाच घेताना रंगेहाथ पकडल्यामुळे त्याच्या कारनाम्याचे किस्से आता जोरदारपणे चर्चिले जात आहेत. त्याल सातारा शेती बाजार समितीच्या माध्यमातून पैसे कमविण्याचा ‘राजमार्ग’ मिळाला होता. त्यामध्ये त्याने कोणतीही कसर बाकी ठेवली नसल्याचे त्याच्या मालमत्तेवरून लक्षात येते. प्रतिमहिना ३५ ते ४0 हजार रुपयांच्या आसपास वेतन असणारी व्यक्ति इतकी मोठी माया जमा करू शकते का आणि परदेश वाऱ्या कशी करू शकते, असाही प्रश्न लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाही पडला आहे. (प्रतिनिधी)
संचालकांसमोरच उर्मट वागणे
रघुनाथ मनवे याच्या केबीनमधील टेबलावर संत, मुनींचे सुविचार ठळकपणे लावलेले असायचे. मात्र, नेमके याच्या उलट वर्तन असायचे, असा आरोप आजपावेतो अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांसोबत छत्रपती शिवरायांचा फोटो या कार्यालयात असलातरी येथील शेतकऱ्यांशी वागणे मात्र याच्या उलटच होते. तो संचालकांसमोरही नेहमी उर्मट वागायचा. त्यावरून त्याला सभापतींनी अनेकदा ताकीदही दिली होती.
सातारा बाजार समिती गेली पाच वर्षे शेतकऱ्यांच्या हितासाठी कधी काम करतच नव्हती. रघुनाथ मनवे याने तर बाजार समितीचे ‘खोका मार्केट’ करून टाकले होते. त्याच्यावर यापूर्वीच कारवाई होणे अपेक्षित होते. आम्ही त्याच्याविरोधात तक्रारी करून थकलो होतो. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, आता त्याचे खरे रुप समोर आले.
- शंकर शिंदे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी
व्यापाऱ्यांना झाला आनंद
सातारा शेती बाजार समितीचा सचिव रघुनाथ मनवे याने अनेक व्यापाऱ्यांना त्रास दिल्याची चर्चा नेहमीच असायची. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याने अनेकांना माहित नव्हते. काहींना ही बातमी उशिरा कळाली. मात्र, ज्यांना-ज्यांना कळाली त्यांनी एकमेकांना भेटून आपल्याला कसा आनंद झाला, याचीच चर्चा केली.
लाचखोर मनवेची
३८ लाखांची मालमत्ता
सचिवाचे कारनामे : चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी
सातारा : तीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलेला सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचा सचिव रघुनाथ वामन मनवे याची मालमत्ता ३५ लाख रुपयांची असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातून देण्यात आली. त्याच्या नावावर विविध बँकांमध्ये तीन लाख रुपयांची रोकड असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, मनवे यास चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचा सचिव रघुनाथ मनवे यास तीस हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या मनवेवाडी (पो. अंबवडे बुद्रूक, ता. सातारा) येथील घराची झडती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. येथे काही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडून आली असलीतरी त्याची माहिती देण्यास लाचलुचपत विभागातून नकार देण्यात आला. त्याचा सातारा येथे शाहुपूरी परिसरात ‘शिवराज’ बंगला आहे. त्या बंगल्यास कुलूप असल्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)
गेल्या एक महिन्यांपासून बाजार समितीवर प्रशासक असल्यामुळे माझा या समितीतील व्यवहारांशी काडीमात्र संबंध नाही. मला या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्याचे षडयंत्र आहे.
- राजू भोसले
राजू भोसलेंची होणार चौकशी
सातारा बाजार समितीवर प्रशासक असलातरी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार आणि त्यातील जबाब लक्षात घेता तत्कालीन सभापती राजू भोसले यांची चौकशी करणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी दिली. ‘ज्यावेळी गाळ्यासाठी पैसे देण्याचा विषय निघाला त्यावेळी राजू भोसले यांच्यासाठी पाच लाखांची मागणी केली होती,’ असा उल्लेख तक्रारदाराने दिलेल्या जबाबात केला आहे.