सहकारातील दीपस्तंभ : स्व. श्रीमंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST2021-02-05T09:19:44+5:302021-02-05T09:19:44+5:30
सातारा म्हणजे मराठ्यांची राजधानी. छत्रपती शिवाजी महाराजांचा समर्थ वारसा चालविणाऱ्या या राजघराण्याचा श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांनी आपल्या अलौकिक ...

सहकारातील दीपस्तंभ : स्व. श्रीमंत
सातारा म्हणजे मराठ्यांची राजधानी. छत्रपती शिवाजी महाराजांचा समर्थ वारसा चालविणाऱ्या या राजघराण्याचा श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांनी आपल्या अलौकिक कार्यकर्तृत्वाने नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न केला. छत्रपती घराण्याचा समाजसेवेचा वारसा जोमाने चालविणाऱ्या दिवंगत अभयसिंहराजे भोसले ऊर्फ भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्याची ओळख जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर करून दिली. सहकाराच्या माध्यमातून सातारा तालुक्याचा कायापालट करणाऱ्या भाऊसाहेब महाराजांना सातारा तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाते. सहकारातील दीपस्तंभ ठरलेल्या भाऊसाहेब महाराजांचा आज १७ वा स्मृतिदिन. यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला छोटासा आढावा...
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तमाम मराठी मनाची अस्मिता आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. याच ऐतिहासिक आणि वंदनीय घराण्यात भाऊसाहेब महाराजांचा जन्म झाला. राजघराण्यातील असलो तरी आपण एक माणूस आहोत, या भावनेतून संपूर्ण जीवन जगताना भाऊसाहेब महाराजांनी अहोरात्र समाजासाठी कष्ट सोसले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणे जीवन जगत भाऊसाहेब महाराजांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी आपले जीवन समर्पित केले. केवळ राजघराण्यात जन्म घेतला म्हणून माणूस मोठा होत नाही; तर त्याच्या कार्यकर्तृत्वाने तो मोठा होतो, हे भाऊसाहेब महाराज यांनी आपल्या अजोड कर्तृत्वाने दाखवून दिले. सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सातारा तालुक्याची अवहेलना होत असताना भाऊसाहेब महाराज यांच्या रूपाने तालुक्याला एक उमदे आणि सक्षम नेतृत्व लाभले आणि सातारा तालुक्याचे नाव राज्याच्या राजकारणात आदराने घेतले जाऊ लागले. या तालुक्याचे नेतृत्व करताना भाऊसाहेब महाराजांनी सहकार क्रांती घडवली आणि सातारा तालुक्यातील गोरगरीब, शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता साधतानाच तालुक्याचा सर्वांगीण विकासही साधला.
उजाड माळरानावर क्रांती
राजकारणात सक्रिय झाल्यानंतर विविध पदे सक्षमपणे सांभाळून त्या पदांच्या माध्यमातून सातारा तालुक्यातील जनतेचा विकास साधण्याचा प्रयत्न भाऊसाहेब महाराज यांनी केला. सहकारमंत्री असताना त्यांनी संपूर्ण राज्यात सहकार क्रांती घडवून आणली. प्रत्येक गावात विकास सेवा सोसायट्यांचे जाळे विणले आणि जगाचा पोशिंदा असलेल्या बळिराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे अनमोल काम केले. ‘विना सहकार नहीं उद्धार’ हे ओळखूनच त्यांनी शेंद्रे येथील उजाड माळरानावर अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. याच कारखान्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांचे आर्थिक जीवनमान उंचावले, हजारो बेरोजगार हातांना रोजगार मिळाला. परराज्यातीलसुद्धा असंख्य घरांतील चुली पेटू शकल्या, वस्तुस्थिती आहे.
उत्तम दर्जाचे सूत उत्पादित
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यानंतर दिवंगत भाऊसाहेब महाराजांनी अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीची उभारणी केली. आज त्यांचे सुपुत्र आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सूत गिरणीतून देशी परदेशी बाजारपेठेत पाठविले जाणारे उत्तम दर्जाचे सूत उत्पादित केले जाते. साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून निर्माण होणारी वीज, वीज वितरण कंपनीला वितरित केली जाते. यामुळेच सातारा शहर आणि तालुक्यातील भारनियमन आटोक्यात आले आहे. भाऊसाहेब महाराज यांच्या मार्गदर्शनातून अजिंक्य उद्योग समूहात विविध संस्थांची उभारणी झाली आणि सहकारातील मानबिंदू म्हणून अजिंक्य उद्योगसमूहाचा नावलौकिक झाला. अजिंक्य उद्योगसमूहामुळे सातारा तालुका राज्याच्या सहकार क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिला आहे.
जलक्रांतीचे जनक
राजकारणात सक्रिय राहून, राजकारणाला कमी महत्त्व देत समाजकारण करणाऱ्या भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुक्यात सहकार क्रांतीबरोबरच जलक्रांती घडवून सातारा तालुक्याला कृषिप्रधान तालुका बनविले. तालुक्यात ठिकठिकाणी पाणीसाठवण बंधारे बांधले. प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडले. प्रत्येक गावात अंगणवाडी, शाळा, व्यायामशाळा, सभामंडप, सुसज्ज ग्रामपंचायत इमारती उभ्या करून प्रत्येक गावाला विकासप्रवाहात आणले. सातारा तालुक्याचा चौफेर विकास साधून जिल्ह्यात सातारा तालुक्याला नेहमीच अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यामुळेच सातारा तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मी राजा नाही, जनतेचा सेवक आहे, हीच भूमिका घेऊन त्यांनी आपले संपूर्ण जीवन जनसामान्यांसाठी खर्ची घातले. असा या सर्वसामान्यांच्या राजाला पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
अमर मोकाशी
जनसंपर्क अधिकारी, सुरुची,
सातारा.