एकमेकांचे पाय ओढणे बंद करा
By Admin | Updated: February 19, 2017 23:05 IST2017-02-19T23:05:18+5:302017-02-19T23:05:18+5:30
वाठार स्टेशन गट : रामराजे नाईक-निंबाळकर यांचे प्रचार सभेत कार्यकर्त्यांना आवाहन

एकमेकांचे पाय ओढणे बंद करा
वाठार स्टेशन : ‘जिल्हा परिषद ताब्यातून गेली तर आता माफी नाही. भविष्यात सहकार क्षेत्राची परिस्थिती बिकट होईल, त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडेल, यासाठी या जिल्हा परिषदेवर गावातील गट-तट बाजूला ठेवून एकमेकांचे पाय न ओढता पुढच्या पिढीचा विचार करा,’ असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
वाठार स्टेशन, ता. कोरेगाव प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, कोरेगाव पंचायत समितीच्या सभापती रुपाली जाधव, राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव
महाडिक, माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कदम, जयश्री भोसले, सुरेखा पाटील, नागेशशेठ जाधव, सरपंच महेश लोंढे, विकास साळुंखे, संभाजीराव धुमाळ, अशोक लेंभे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रामराजे म्हणाले, ‘आत्ताच्या सरकारने अडीच वर्षांत शेतकऱ्यांचं जीवन जगणं मुश्कील केलं आहे. नोटाबंदीच्या परिणामाने अनेक उद्योग बंद पडले. अनेक तरुण बेरोजगार झाले तर शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकाला दर नाही, अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जनता दबली आहे. शहरी भागात मतदारसंघ वाढले, यामुळे या सरकारने ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत शहरी मतदारांना खूश करण्याची भूमिका घेतली आहे. मुळात या शासनाला शेतकरी नको तर व्यापारी जगवायचा आहे.’
यावेळी आमदार दीपक चव्हाण, बाळासाहेब सोळस्कर, राजेंद्र भोसले यांची भाषणे झाली.
यावेळी नागेशशेठ जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
सरपंच महेश लोंढे यांनी आभार मानले. (वार्ताहर)