दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा : देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST2021-09-05T04:44:32+5:302021-09-05T04:44:32+5:30
कोयनानगर : ‘पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे पाठविण्याच्या ...

दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा : देसाई
कोयनानगर : ‘पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे दरडग्रस्तांच्या पुनर्वसनास गती मिळणार आहे,’ अशी माहिती गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
सातारा येथे शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस शंभुराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह अधिकारी सहभागी झाले होते.
पाटण तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती. बाधित कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. याबाबत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवणार असून, त्यासंदर्भात राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तातडीने सूचना करण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती दिली. यामुळे एक -दीड महिन्यापासूनच पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार आहे.
ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, आंबेघर गावात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीने अनेकांचे बळी गेले; तर घर, शेती, पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले होते. या घटनेनंतर शासकीय अधिकाऱ्यांसह नेते, मंत्र्यांचे आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचे पाहणी दौरे झाले.
पुनर्वसनासारखी प्रक्रिया ही कमी वेळेत पूर्ण न होणारी असताना, ही राज्य शासनाकडून राज्यातील इतर महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून शासनाने प्राधान्याने पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हाती घेतला आहे. या घटनेला केवळ दीड महिना उलटायच्या आधीच मंत्री देसाई यांच्या प्रयत्नामुळे महाविकास आघाडी सरकारने दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत.
शंभुराज देसाई म्हणाले, ‘पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या दरडप्रवण क्षेत्रातील धोकादायक गावांमधील कुटुंबियांचे कायमस्वरुपी पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करण्यासंदर्भात नगरविकास मंत्री ना एकनाथ शिंदे यांनी दिल्या असून, यासंदर्भात सातारा येथे नुकतीच व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत नगरविकास मंत्री शिंदे यांनी दरडप्रवण क्षेत्रातील धोकादायक गावांमधील कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.