गॅसधारकांना यापुढे केरोसीन न देण्याचे स्पष्ट आदेश

By Admin | Updated: September 24, 2015 23:54 IST2015-09-24T22:24:54+5:302015-09-24T23:54:48+5:30

कऱ्हाड : रेशनिंग दुकानदार व तहसीलदार यांची बैठक

A clear order for non-Kerosene gas for gas users | गॅसधारकांना यापुढे केरोसीन न देण्याचे स्पष्ट आदेश

गॅसधारकांना यापुढे केरोसीन न देण्याचे स्पष्ट आदेश

कऱ्हाड : शासन निर्णयानुसार यापुढे एक गॅस व दोन गॅस असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना केरोसीनचा पुरवठा बंद करण्यात आला असून बिगर गॅसधारकांनाच केरोसीन देण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांनी दिली. शासनाच्या धोरणानुसार व शासन निर्णयाप्रमाणे केरोसीन वाटपाबाबत राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांच्या केरोसीन वितरणाचे परिमाण एकरूप करण्यासाठी राज्य शासनाकडील अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या शासन निर्णयाप्रमाणे केरोसीन वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारक व महसूल विभाग यांची गुरूवारी येथील रेव्हेन्यू क्लब येथे बैठक झाली. या बैठकीवेळी त्यांनी माहिती दिली. बैठकीस रास्तभाव धान्यदुकानदार व केरोसीनधारक संघटनेचे अध्यक्ष अशोकराव पाटील उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले, संगणीकरणासाठी शिधापत्रिका धारकांकडून फॉर्म मिळत नसल्याने केसरी कार्डधारकांना धान्य मिळत नाही. त्यामुळे याबाबत शिधापत्रिकाधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.  आधारकार्ड काढले नसल्यामुळे तसेच रॉकेलसाठा कमी झाल्यामुळे शिधापत्रिकाधारक फॉर्म भरून देण्यास टाळाटाळ करीत आहेत. याबाबत शासनाचे धोरण प्रशासनाने लोकांना समजून सांगणे आवश्यक आहे.  तसेच याबाबत प्रशासनाने स्थानिक पातळीवर प्रचार व प्रसार करावा लोकांना या कामकाजाबाबत संपूर्ण माहिती दिल्यास नागरिक फॉर्म भरून देण्यास प्रवृत्त होतील. कऱ्हाड तालुक्यात १ लाख ३४ हजार ८०० एकूण शिधापत्रिका आहेत. त्यापैकी सध्या ७६ हजार फॉर्मस् जमा झालेले आहेत व ५६ हजार फॉर्मस् जमा होणे बाकी आहेत. संबंधित रास्तभाव दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांनी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. संबंधित रास्तभाव दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांनी फॉर्म उपलब्ध करून घ्यावेत व तत्काळ परिपूर्ण करून रास्तभाव दुकानदारांकडे जमा करावेत, असे आवाहन निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांनी बैठकीत केले. (प्रतिनिधी)

Web Title: A clear order for non-Kerosene gas for gas users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.