स्वच्छता झाली; पण खड्ड्यांचे काय?
By Admin | Updated: November 26, 2014 00:06 IST2014-11-25T22:03:45+5:302014-11-26T00:06:16+5:30
खटाव तहसील परिसरातील अवस्था : पाच महिन्यांपासून वृक्षारोपण प्रतीक्षेत

स्वच्छता झाली; पण खड्ड्यांचे काय?
वडूज : साखर झोपेतल्या मानवाला चिमटा काढल्याशिवाय जशी जाग येत नाही, तसेच संबंधित प्रशासकीय विभागाबाबत तक्रारकेल्याशिवाय काहीच करायचे नाही, असे चित्र सध्या वडूज परिसरातील दिसत आहे. तहसील परिसरातील स्वच्छता झाली परंतु झाडे लावण्यासाठी काढलेल्या खड्ड्यांचे काय? असा प्रश्न ये-जा करणाऱ्या नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.
अस्वच्छतेबाबत ओरड होत होती. मात्र ‘लोकमत’च्या दणक्याने संबंधित प्रशासन खडबडून जागे झाले आणि तहसील पसिररातील स्वच्छता तातडीने झाली. परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी तहसील कार्यालयाच्या पसिररात झाडे लावण्यासाठी असंख्य गुडघाभर खड्डे काढण्यात आले. हे खड्डे नेमके झाडे लावण्यासाठी आहेत की येथे कोणी गाड्या पार्किंग करून नये यासाठी आहेत? हे न उलगडणारे कोडे आहे. कृषी विभागाची रोपवाटिका तहसील कार्यालयापासून एक किमी अंतरावर असून आजपर्यंत या परिसरात रोपे पोहोचली नाहीत. झाडे लावण्यासाठी तहसील उदासिन का? या रोपांना लागणारे पाणी ही कार्यालयाजवळ असणाऱ्या टाकीमधून उपलब्ध होऊ शकते. या रोपांना ठिबकद्वारे पाणी घातले तरी या रोपांचे वृक्ष होतील.
रस्ता रुंदीकरण व संभाव्य अपघात टाळण्यासाठी वडूज परिसरात झाडांची कत्तल झाली. ही झाडे तोडताना वन विभागाची परवानगी घेतली का नाही? या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु अधिकारी जागेवर कमी, साताऱ्यात जादा असतात.'
तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरात वाहतुकीचे रस्ते, दुरुस्तीचे काम करण्याचे सोडून इतर ठिकाणची कामे तातडीने झाली. याचा अर्थ असा की लोकप्रतिनिधींचा अभाव होय. या अधिकाऱ्यांना याच शहरात वावरताना हे खड्डे दिसत नाहीत का ? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्डे व तहसील कार्यालय परिसरातील खड्ड्यांचे
नेमके कारण काय ? हा संशोधनाचा विषय ठरत आहे. लवकरच नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय रुजू होईल. मात्र पारतंत्र काळापासून तालुक्याला न्याय देण्याची भुमिका घेणाऱ्या या तहसील कार्यालयाचा परिसर एक ‘यादगार’ ठरण्यासाठी प्रयत्न होणे काळाची गरज
आहे. (प्रतिनिधी)
खड्ड्यात कचरा
तहसील कार्यालय परिसरात पावसापुर्वी एकूण ३५ खड्डे खणण्यात आले आहेत. या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार होते. मात्र गेली अनेक महिने हे खड्डे वृक्षांविना असेच पडून आहे. या खड्ड्यात सध्या माती व घाण साचत आहे.
नविन प्रशासकीय इमारत परिसर व सध्याच्या तहसील कार्यालय परिसरात ८ ते १० फुट ऊंचीची तयार झाले. येत्या दोन दिवसात लावण्यात येणार असून यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
- विवेक साळुंखे, तहसीलदार