शिवकालीन विहिरीची साफसफाई
By Admin | Updated: November 26, 2014 00:05 IST2014-11-25T22:01:47+5:302014-11-26T00:05:38+5:30
तरुणाईचा पुढाकार : खंडाळ्यात इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्याचा प्रयत्न

शिवकालीन विहिरीची साफसफाई
खंडाळा : महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तू, शिवकालीन गड-किल्ले, प्राचीन वस्तू हे महाराष्ट्राचे खरे वैभव आहे. मात्र, या इतिहासाच्या खुणा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्या जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच कर्तव्यभावनेतून खंडाळ्यातील शिवप्रेमींनी प्राचीन शिवकालीन विहिरीची साफसफाई करून या ऐतिहासिक वास्तूला उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही विहीर पाहण्याचा मार्ग खुला झाला आहे. खंबाटकी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी व पर्यटकांसाठी ही मोठी पर्वणी समजली जात आहे.
खंडाळ्यातील खंबाटकी घाटाच्या पायथ्याला जुन्या शिवरायांच्या मार्गावर प्राचीन विहीर आहे. दगडी पण सुबक बांधकामाचे तीन कमानी, पायऱ्या उतरून गेल्यावर पुढे ३० फूटी व्यासाची विस्तीर्ण विहीर, चुना बांधकामातील ही दगडी विहीर अगदी चिरेबंद आहे. मात्र घाटातील अडवळणी बाजूला असल्याने सदैव दुर्लक्षित राहिलेली. त्यामुळे त्या विहिरीभोवती काटेरी झाडे-झुडपे व इतर झाडेही वाढलेली होती. त्याकडे जाण्याचा मार्गही अडसरीचा होता. ही प्राचीन वास्तू अडगळीत पडल्याचे शिवप्रेमी व्ही. व्ही. वैद्य, शेखर खंडागळे, इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांच्या लक्षात येताच त्यांनी पुढाकार घेऊन खंडाळ्यातील शिवप्रेमींना एकत्रित केले.
सह्याद्री गडकोट भ्रमंती संघटनेचे सदस्य व शिवप्रेमींनी रविवारच्या सुट्टीचा दिवस याकामी सार्थकी लावण्याचे ठरविले व त्याप्रमाणे तीस ते पस्तीस लोकांनी अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी एकत्रितपणे विहिरीभोवतीची काटेरी झाडे काढली. विहिरीची साफसफाई केली. संपूर्ण परिसर स्वच्छ केला. डोक्यावर असणाऱ्या उन्हाची तमा न बाळगता शिवप्रेमाने भारावलेल्या मनांनी व मुखात शिवगर्जना करीत ही ऐतिहासिक वास्तू जतन करण्याचा प्रयत्न केला.
या स्वच्छता मोहिमेत लेखक विलास वरे, युवा नेते अभिजित खंडागळे, रमेश चव्हाण, संतोष देशमुख, बापू रासकर, राजू सोनावणे, विलास भोसले, प्रमोद भोसले, उत्तम कदम, सुनील खुडे, विजय शिंदे, प्रदीप गाढवे, रितेश गाढवे, हर्षल वरे, बाबू गाढवे, सौरभ भोसले, सुरज गाढवे, ओंकार शिंदे, अभय शिंदे, अविनाश शिंदे यांसह गडकोटभ्रमंती संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
तालुक्यातील ठिकठिकाणी असणाऱ्या प्राचीन वास्तू, ठिकाणे जतन करण्यासाठी यापुढे सातत्याने काम करण्याचे संघटनेने ठरविलेले आहे. (प्रतिनिधी)