खोल्यांची स्वच्छता; पण गठ्ठ्यांचं काय?
By Admin | Updated: October 6, 2015 23:39 IST2015-10-06T20:35:49+5:302015-10-06T23:39:06+5:30
कऱ्हाड पंचायत समितीत स्वच्छता अभियान : परिसर चकाचक करूनही कोपऱ्यात गठ्ठेच गठ्ठे --बातमी मागची बातमी...

खोल्यांची स्वच्छता; पण गठ्ठ्यांचं काय?
संतोष गुरव - कऱ्हाड --शासकीय कार्यालयांत ६ आॅक्टोबर हा दिवस ‘स्वच्छता दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हा परिषदतर्फे घेण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामपंचायतीमधील शासकीय कार्यालयात स्वच्छता दिवस साजरा करण्याचे आदेश सर्व गटविकास अधिकारी व सभापती, उपसभापती यांना दिले.
त्यातून तालुकास्तरावर, पंचायत समितीत गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तर गावस्तरावर ग्रामपंचायतीत ग्रामसेवक, सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय कार्यालयाची स्वच्छता करण्यात आली. कऱ्हाड पंचायत समितीमध्येही मंगळवारी कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली. मात्र, एक महिन्यांपासून धूळ खात पडलेले गठ्ठे अजून आहे त्या ठिकाणी जैसे थे अशा अवस्थेत होते.
कऱ्हाड पंचायत समितीमध्ये मंगळवारी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाची स्वच्छता केली. यावेळी गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीमधील २० खोल्यांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांनी खोल्यांसह परिसराची स्वच्छता केली खरी मात्र, शिक्षण विभागाशेजारी गेल्या महिन्याभरापासून धूळखात पडलेल्या फायलींच्या गठ्ठ्यांकडे मात्र कुणाचेही लक्ष गेले नाही.
गटविकास अधिकारी फडतरे यांनी आम्ही दोन तास स्वच्छता अभियान राबवले असल्याचे सांगितले खरे मग हे गठ्ठे अजुनही जसेच्या तसे कसे काय पडले आहेत? हा प्रश्न इथं येणाऱ्या सर्वांनाच पडता होता. इमारतीच्या कोपऱ्यात धुळ खात पडलेल्या महत्वाच्या कागदपत्रांच्या फायलींच्या गठ्ठ्यांकडे गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांचे लक्ष कसे काय गेले नाही? जागेअभावी विभागाच्या कोपऱ्यात ठेवण्यात आलेल्या गठ्ठ्यांवरची धुळ झाडून ते गठ्ठे व्यवस्थित ठेवण्यात आल्याने तात्पुत्या स्वरूपात मात्र, विभागात स्वच्छता दिसून आली. मात्र, अशी स्वच्छता नियमितपणे का केली जात नाही. ती केली जावी कारण शासकीय कार्यालयातील वातावरण हे नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. या ठिकाणी कामाच्या निमित्ताने दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकडून देखील कचरा केला जातो. मात्र, तो हटविण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असते. तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी देखील स्वच्छतेबाबत सर्वांना सूचना केल्या आहेत. अशातून जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींमध्ये नियमित स्वच्छता ठेवणे गरजेचे मानत स्वच्छतेच्या योजना राबविल्या कऱ्हाड पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांनीही देखील सकाळी अकरा ते दुपारी बारा या वेळेत आपापल्या कार्यालयाची स्वच्छता केली. मात्र, धूळ खात पडलेल्या गठ्ठ्यांकडे कुणाचेही लक्ष गेले नाही.
स्टोअर रूमच्या खोलीत जुने पूर्वीचे लिखीत स्वरूपातील योजनांच्या फायली, लाथार्थ्यांचे व तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या माहितींचे महत्वाचे गठ्ठे ठेवण्यात आले आहेत. या खोलीची तसेच शिक्षण विभागाशेजारील खोलीची स्वच्छता मात्र करण्यात आलेली नसल्याचे दिसून आले. महत्वाच्या या दोन्ही जागेकडून नागरिकांची कमी वर्दळ असल्याने त्या ठिकाणी मात्र, स्वच्छता न करण्यातच कर्मचारी व अधिकाऱ्यांची धन्यता मानली असावी.
२० खोल्यांच्या स्वच्छतेसाठी फक्त दोन तास
कऱ्हाड पंचायत समितीत एकूण दोन मजले आहेत. दोन मजल्यांच्या इमारतींमध्ये २० खोल्या या खोल्यांमधील महत्वाच्या फायलींची स्वच्छता कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी मंगळवारी केली. यासाठी त्यांना दोन तास लागला.
परिसराची स्वच्छता
‘मनाची कधी’?
मंगळवारी पंचायत समितीमधील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या विभागाची स्वच्छता केली. परिसराची स्वच्छता झाल्याने तो निर्मळ दिसत होता. काही अधिकाऱ्यांच्या मनाची स्वच्छता अजून होणे गरजेचे असल्याचे इथे येणाऱ्यांकडून सांगितले जात होते.
सदस्य आश्चर्यचकित !
पंचायत समितीमध्ये मंगळवारी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या विभागाची दोन तास स्वच्छता केली. यावेळी नेहमीप्रमाणे पंचायत समितीत कामानिमित्त आलेल्या सदस्य मात्र, आश्चर्यचकीत झाले. दररोज कामाव्यतरिक्त कोणतेही काम न करणारे अधिकारी व कर्मचारी स्वच्छता करत असल्याचे दिसल्याने त्यांच्या या कामाचे सदस्यांमधून आश्चर्य व्यक्त केले जात होते.