औषध फवारणी अन् नाल्यांची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST2021-03-19T04:38:14+5:302021-03-19T04:38:14+5:30

सातारा : रोगराईच्या विळख्यात सापडलेल्या साताऱ्यातील सदर बाझार झोपडपट्टीतील स्वच्छतेला अखेर पालिका प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली. गुरुवारी दिवसभर येथील ...

Cleaning of drug spraying facilities | औषध फवारणी अन् नाल्यांची स्वच्छता

औषध फवारणी अन् नाल्यांची स्वच्छता

सातारा : रोगराईच्या विळख्यात सापडलेल्या साताऱ्यातील सदर बाझार झोपडपट्टीतील स्वच्छतेला अखेर पालिका प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली. गुरुवारी दिवसभर येथील गटारे व नाल्यांची स्वच्छता करण्याबरोबरच ठिकठिकाणी औषध फवारणी देखील करण्यात आली.

साताऱ्यातील सदर बाझार, लक्ष्मी टेकडी हा सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेला परिसर आहे. या ठिकाणी एक हजाराहून अधिक झोपड्या असून, सुमारे साडेचार हजार नागरिक झोपडपट्टीत वास्तव्य करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या झोपडपट्टीला समस्यांचे ग्रहण लागले आहे. उघड्यावरून वाहणारे सांडपाणी, ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, वराहांची वाढती संख्या यामुळे झोपडपट्टीवासीय घायकुतीला आले आहेत. अस्वच्छता व घाणीमुळे येथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. या सर्व समस्यांचा आढावा घेत ''लोकमत''ने येथील नागरिकांशी संवाद साधला अन् त्यांच्या भावनांना वाचा फोडली. ''आमची वस्ती बनतेय रोगराईची खाण'' या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत पालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी दिवसभर सदर बाझार झोपडपट्टी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. ठिकठिकाणी साचलेला कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. उघडी गटारे काही प्रमाणात मुजविण्यात आली, तर झोपडपट्टी परिसरात औषध फवारणी करण्यात आली. अनेक महिन्यांनंतर या परिसरात स्वच्छता मोहीम राबविली गेल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

(चौकट)

तात्पुरती नको, कायमस्वरूपी उपाययोजना हवी

पालिकेकडून सदर बाझार परिसरात स्वच्छता केली जाते. मात्र, या मोहिमेत सातत्य नसते. त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून साथरोग पसरण्याची भीती निर्माण होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने केवळ तात्पुरती नव्हे, तर या परिसरात सातत्याने स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवावे, अशी अपेक्षा येथील रहिवाशांनी ''लोकमत''शी बोलताना व्यक्त केली.

लोगो : लोकमत फॉलोअप

फोटो मेल : सातारा पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून गुरुवारी सदर बाझार झोपडपट्टी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. (छाया : जावेद खान)

Web Title: Cleaning of drug spraying facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.