पुसेगाव येथील ओढ्याची साफसफाई व खोलीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:46 IST2021-08-18T04:46:02+5:302021-08-18T04:46:02+5:30
पुसेगाव : पुसेगावमधील लेंडोरी ओढ्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणात वाहून आलेला गाळ आणि अस्वच्छ पाणी साठल्याने अनेक ठिकाणी जलपर्णी ...

पुसेगाव येथील ओढ्याची साफसफाई व खोलीकरण
पुसेगाव :
पुसेगावमधील लेंडोरी ओढ्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणात वाहून आलेला गाळ आणि अस्वच्छ पाणी साठल्याने अनेक ठिकाणी जलपर्णी वनस्पतींचे साम्राज्य निर्माण झाले होते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ओढ्याची स्वच्छता करून त्यातला गाळ काढून प्रवाहाचा मार्ग मोकळा केला.
गावातील सांडपाणी, कचरा या ओढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर टाकले जात असल्याने त्यांची स्वच्छ पाण्याची क्षमता जवळपास संपुष्टात येऊन जलप्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली होती. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांनी याबाबत सातत्याने मागणी केल्यानेच या ओढ्याची स्वच्छता झाली. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
या ओढ्यातील घाणीच्या साम्राज्यामुळे परिसरात डासांचे तसेच दुर्गंधी पसरली होती. सद्य:स्थितीत पुसेगावात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची गंभीर समस्या लक्षात घेता पुसेगाव ग्रामपंचायतीने पोकलेन मशीनच्या साहाय्याने ओढ्यातील कचरा हटविला. याशिवाय झाडे-वेली यांची झालेली रेलचेल दूर करण्यात आली. कुंभार टेक ते बेघर वस्तीपर्यंत ओढ्याचे खोलीकरण व स्वच्छता करण्यात आले.
सद्य:स्थितीत उत्तर खटावमधील अंतर्गत वस्त्यांमधून वाहत जाणाऱ्या काही ओढ्यांना गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले असून, त्यांच्या जलप्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याचे विपरीत परिणाम आरोग्य आणि पर्यावरणावर होत आहेत. प्रदूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ, मेंदूचे विकार, पोटाचे विकार असे अनेक आजार होण्याची शक्यता असते.
फोटो
:
पुसेगाव येथे लेंडोरी ओढ्याची साफसफाई, खोलीकरण करण्यात आले. (छाया : केशव जाधव)