शहरातील शौचालयांना चकाकी
By Admin | Updated: December 1, 2015 00:19 IST2015-11-30T21:22:55+5:302015-12-01T00:19:18+5:30
दानशूर सातारकरांचे सहकार्य : ‘कर्तव्य’ने केले होते आवाहन

शहरातील शौचालयांना चकाकी
सातारा : कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांच्या पुढाकाराने व्हिजन सातारा टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी आणि काही दानशूर लोकांच्या मदतीने शहरातील दुरवस्था झालेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मंगळवार पेठेतील होलार वस्ती येथील १६ सीटच्या शौचालयाच्या दुरुस्तीचे काम नुकतेच पूर्णत्वास गेले असून, या शौचालयाच्या इमारतीने कात टाकल्याची समाधानकारक प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. वेदांतिकाराजे भोसले यांनी मंगळवार पेठेतील होलार वस्ती येथे भेट दिली असता नागरिकांनी स्वच्छतागृहाबाबतच्या समस्या त्यांना सांगितल्या होत्या. शौचालयाचे दरवाजे तुटले असून, लाईट व पाण्याची व्यवस्था नसल्याचे नागरिकांनी सांगितले. हिच परिस्थिती शहरातील अनेक भागात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वेदांतिकाराजे भोसले यांनी शहरातील दानशूर लोकांनी सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला व्हिजन टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी सातारा आणि काही दानशूर लोकांनी प्रतिसाद दिल्यानंतर वेदांतिकाराजे भोसले यांच्या पुढाकाराने शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीचा उपक्रम हाती घेण्यात आला.
‘व्हिजन’ चे सदस्य राजेश माने यांनी स्वखर्चाने होलार वस्तीतील १६ सीटर शौचालय दुरुस्तीचे काम केले. त्यांनी या शौचालयाला नवीन दारे बसवले असून, नवीन भांडी, फरशी, टाईल्स, प्लास्टर तसेच दारांच्या चौकटीही बदलल्या. (प्रतिनिधी)