निम्मं शहर शाहूपुरीत.....अख्खी जबाबदारी ‘सिटी’त!
By Admin | Updated: August 7, 2014 00:13 IST2014-08-06T21:31:19+5:302014-08-07T00:13:45+5:30
१२५ कर्मचारी : शाहूपुरी पोलीस ठाणे उचलणार २५ टक्के भार !

निम्मं शहर शाहूपुरीत.....अख्खी जबाबदारी ‘सिटी’त!
सातारा : नवीन शाहूपुरी पोलीस ठाणे काही दिवसांतच सुरू होणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र शाहूपुरीत नवीन पोलीस ठाणे कार्यरत झाले तरी शहर पोलीस ठाण्यावरील केवळ २५ टक्केच ताण कमी होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. औद्योगिक वसाहतीमधील पोलीस ठाणे मंजूर झाल्यास एकूण तीन पोलीस ठाणे होतील. या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी एकत्र मिळून काम केल्यास सातारा शहरातील गुन्हेगारी पूर्णपणे आटोक्यात येईल, असा विश्वास पोलिसांना आहे.
शाहूपुरी पोलीस ठाणे कार्यान्वित होणे अत्यंत गरजेचे होते. जिल्हा पोलीस दलातर्फे शाहूपुरी आणि एमआयडीसी पोलीस ठाणे, असे दोन प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी शासनाने शाहूपुरी पोलीस ठाण्याला मंजुरी दिली. नवीन पोलीस ठाणे शाहूपुरी ग्रामपंचायतीशेजारील एका इमारतीमध्ये सुरू होणार आहे. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शाहूपुरी पोलीस ठाणे प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यावरील कामाचा ताण किती कमी होईल, याचा शोध घेतला. त्यावेळी अनेक समस्या आणि काही चांगल्या बाबीही समोर आल्या. शहर पोलीस ठाणे ते शाहूपुरी सुमारे तीन किलोमीटर अंतर आहे. शाहूपुरीतील मुख्य चौकापासून चारीबाजूला सुमारे दोन किलोमीटरपर्यंत शाहूपुरीचा विस्तार झाला आहे. शाहूपुरीमधील यापूर्वी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत या परिसरातील गुन्ह्यांचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले होते. त्यामध्ये चोरी आणि लूटमार या गुन्ह्यांचा त्यामध्ये समावशे होता. या गुन्ह्यांचे प्रकार वाढल्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाणे मंजूर व्हावे, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्याला हिरवा कंदील दाखविला. शाहूपुरी पोलीस ठाणे स्वतंत्र झाल्यानंतर केवळ २५ टक्केच ताण शहर पोलीस ठाण्यावरील कमी होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शहराचा मध्यभाग या नवीन पोलीस ठाण्यात समाविष्ठ करण्यात आला आहे. त्यामुळेही बराच फरक पडणार आहे.
राजवाड्यापासून वरच्या भागात गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. मारामारी, दरोडे, चोरी, मालमत्तेचे गुन्हे या परिसरामध्ये वारंवार घडत आहेत. त्यामुळे या नवीन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांवर हे सर्व गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीचा परिसर प्रचंड मोठा आहे.
संगम माहुलीपासून औद्योगिक वसाहत, शिवराज पेट्रोलपंप ते वाढे फाटा, असा परिसर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्यामुळे शहर पोलिसांना प्रचंड पळापळ करावी लागते. (प्रतिनिधी)
‘शाहूपुरी पोलीस ठाणे मंजूर होणे अत्यंत महत्त्वाचे होते. शहराचा निम्मा भाग त्या पोलीस ठाण्यात समाविष्ट झाला तरी शहर पोलीस ठाण्यावरील बराचसा ताण कमी होईल, पोलिसांना काम करणेही सोपे जाईल तसेच गुन्ह्यांचे प्रमाणही आटोक्यात येईल.’
- राजीव मुठाणे, शहर पोलीस निरीक्षक
करंजे ते बोगदा...शाहूपुरी हद्दीत !
शाहूपुरी पोलीस ठाण्याला १२५ कर्मचाऱ्यांचा ताफा मंजूर झाला असून, या नवीन पोलीस ठाण्याची हद्द निश्चित करण्यात आली आहे. संपूर्ण शाहूपुरी, राजवाडा परिसर, बोगदा परिसर, मोती चौक, बुधवार नाका, राधिका रोड, करंजे, बसस्थानक परिसराचा पाठीमागील परिसर असा भाग शाहूपुरी पोलीस ठाण्यात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यावरील ताण थोडातरी हलका होणार आहे.