‘सीआयडी’ करमाळ्यात

By Admin | Updated: June 22, 2016 00:12 IST2016-06-21T22:45:43+5:302016-06-22T00:12:42+5:30

आणखी काही आरोपी : ‘त्या’ पाचजणांना अटक शक्य

In 'CID' tax | ‘सीआयडी’ करमाळ्यात

‘सीआयडी’ करमाळ्यात

कऱ्हाड : पोलिसांच्या ताब्यातील संशयिताच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी गुप्तचर विभागाचे पथक मंगळवारी करमाळा (ता. सोलापूर) येथे गेले. दोन दिवस त्या ठिकाणी तपास केला जाणार असून, नातेवाइकांचे जबाब नोंदविले जाण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण घटनाक्रमही फिर्यादीकडून पुन्हा एकदा स्पष्ट केला जाणार असल्याचे समजते. दरम्यान, तपासात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचे गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.
संशयित रावसाहेब जाधव याच्या खूनप्रकरणात प्रथमदर्शनी पोलिस निरीक्षक विकास धस, सहायक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह पाचजण निष्पन्न झाले आहेत. त्यांच्या अटकेसाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सोने-चांदी व्यापाऱ्याकडील ७७ लाखांचे अडीच किलो सोने चोरीस गेल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात संशयित म्हणून रावसाहेब लक्ष्मण जाधव (वय ४२, रा. निंभोरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) याचे नाव समोर आले. प्रकटीकरणचे पथक करमाळ्याला गेले. तेथून त्यांनी रावसाहेब जाधवसह अनिल डिकोळे याला ताब्यात घेतले. दोघांनाही कऱ्हाडला आणून कार्वे नाका पोलिस चौकीत बसविण्यात आले. त्याठिकाणी पोलिस निरीक्षक विकास धस, सहायक निरीक्षक काकंडकी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीतच रावसाहेब जाधवचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी सोमवारी कऱ्हाडात मोर्चाही काढण्यात आला. त्यानंतर सोमवारी सायंकाळी अनिल डिकोळे याच्या फिर्यादीनुसार विकास धस, हणमंत काकंडकी यांच्यासह इतरांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी या प्रकरणाच्या तपासासाठी ‘सीआयडी’चे पथक करमाळ्याला गेले आहे. (प्रतिनिधी)


जाधववर निंभोरेत अंत्यसंस्कार
पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी रात्री नातेवाइकांनी रावसाहेब जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेतला. मध्यरात्री मिरजमधून मृतदेह घेऊन रुग्णवाहिका करमाळ्याला रवाना झाली. पहाटे तीन वाजता ती निंभोरे येथे पोहोचली. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

Web Title: In 'CID' tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.