उन्हाळी सुटींच्या सहलींनी चाफळ परिसर गजबजला
By Admin | Updated: May 19, 2015 00:33 IST2015-05-18T22:04:25+5:302015-05-19T00:33:09+5:30
राममंदिर देवस्थानने तयार केलेली ‘प्रकटले श्रीराम चाफळी’ ही चित्रफीत पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत.

उन्हाळी सुटींच्या सहलींनी चाफळ परिसर गजबजला
चाफळ : शाळा, महाविद्यालयांना मे महिन्याची सुटी लागल्याने चाफळचे राममंदिर, शिवसमर्थ स्मारक, रामघळ परिसर भाविक व पर्यटकांनी गजबजून गेला आहे. चाफळ हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने येथील आल्हाददायक नैसर्गिक परिसरामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक पर्यटक मोठ्या संख्येने येतात. सध्या शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुटी असल्याने अनेक निसर्गप्रेमी आपली उपस्थिती लावत आहेत. मध्यंतरी पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला असला तरी तीव्र उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी पणजी, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर, विजयदुर्ग तसेच परदेशी पर्यटकही याठिकाणी गर्दी करू लागले आहेत. शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुटी लागल्यानंतर साधारणपणे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून दोन महिने येथे उन्हाळी हंगाम असतो. या कालावधीत पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक दुकानदार शीतपयांची विक्री सुरू करतात. इतर वस्तूंचेही स्टॉल असून, ग्राहकांच्या प्रतिसादामुळे स्टॉलधारक समाधानी आहेत. सध्या चाफळला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला असून, भरीव निधीतून मंदिर परिसरात विकासाची कामे पूर्ण झालेली
आहेत. येथील चोख व्यवस्थापनामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. राममंदिर देवस्थानने तयार केलेली ‘प्रकटले श्रीराम चाफळी’ ही चित्रफीत पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. राम दर्शनाबरोबरच येणार पर्यटक कुबडीतीर्थ, शिवसमर्थ स्मारक, तानाजी मालुसरे सभागृह, खडीचा मारुती, रामघळ, उत्तरमांड प्रकल्प या स्थळांनाही आवर्जून भेट देत आहेत. भविक, पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन, देवस्थान ट्रस्टच्या वतीने ११ खोल्या व एक प्रशस्त हॉल असे सर्व सुविधांनियुक्त भक्तनिवास बांधण्यात आले आहे. याचाही लाभ भाविकांसाठी होत आहे. एकंदरीत उन्हाळी सुट्या लागल्याने उन्हाळी सहलींनी राममंदिर परिसर गजबजून गेला आहे.(वार्ताहर)