चूल, मूल ही झूल उतरली!
By Admin | Updated: February 4, 2015 23:53 IST2015-02-04T22:40:44+5:302015-02-04T23:53:07+5:30
महिलाराज : सायगाव विभागात महिला ग्रामसभा फुल्ल

चूल, मूल ही झूल उतरली!
सायगाव : पंचायत राज व्यवस्थेमधील आजवर दुर्लक्षित राहिलेल्या महिला ग्रामसभांना यावेळी झालेल्या महिला ग्रामसभा अपवाद ठरल्या आहेत. सायगाव विभागातील विविध गावांमधून महिलांची अभूतपृर्व उपस्थिती मिळाल्याने भविष्यात ‘महिला राज’ ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.नुकत्याच झालेल्या महिला ग्रामसभांना महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. महिगाव गावात शंभरच्या आसपास तर दुदुस्करवाडीसारख्या छोट्या गावातही सत्तर ते ऐंशी महिला उपस्थित होत्या. परंपरेने आलेली चूल आणि मूल ही झूल उतरवून बहुसंख्येने पावलं महिला ग्रामसभांकडे वळताना दिसली.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांचे स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून सक्षमीकरण सुरू आहे. गावोगावी गरीब महिलांचे बचत गट स्थापन झाले आहेत. हे सर्व गट दशसूत्रीवर चालतात. ज्यातून महिलांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण होत आहे. परिणामी कधी काळी महिला ग्रामसभा ही दुष्कर असणारी गोष्ट आता प्रत्यक्षात येत आहे.
आता आमचे प्रश्न आम्हीच सोडविणार, असा संदेश या निमित्ताने तमाम महिलांनी दिला आहे. महिलांचा हा उत्साह पाहून या सकारात्मक बदलास समाजातील सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. (वार्ताहर)
गावातील प्रत्येक महिला ग्रामसभेपर्यंत येणे आणि तिने आपले प्रश्न धीटपणे मांडणे ही महिला सक्षमीकरणाची नांदी आहे.
- जयश्री भोसले, सरपंच, महिगाव
मी समुदाय संसाधन व्यक्ती (सीआरपी) म्हणून बचत गटांना मदत व मार्गदर्शन करते. गरीब महिलांना गरिबीतून बाहेर पडण्याची प्रचंड इच्छाशक्ती असते. या अभियानाच्या माध्यमातून ती चालून आली आहे.
- विजया जगताप,
सीआरपी, सायगाव
शासनाने महिला बचत गटांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे महिला सामाजिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. पर्यायाने महिला ग्रामसभेस प्रचंड संख्येन महिला उपस्थित राहत आहेत. सायगाव विभागात नुकत्याच झालेल्या महिला ग्रामसभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये आनेवाडी महिला ग्रामसभेस ११५, महिगाव ९०, दुदुस्करवाडी ८०, सायगाव ४५ तर दरे खुर्द येथे ३० महिला उपस्थित होत्या.