बाटली आडवी करण्याचा चंग
By Admin | Updated: January 23, 2015 23:37 IST2015-01-23T20:12:29+5:302015-01-23T23:37:20+5:30
कार्वेच्या महिला आक्रमक : प्रजासत्ताकदिनी काढणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बाटली आडवी करण्याचा चंग
कऱ्हाड : कऱ्हाड शहरालगतच्या कार्वे गावाच्या प्रवेशद्वारावरच विदेशी दारूची बाटली उभी आहे़ ही बाटली आडवी करण्यासाठी कार्वेतील रणरागिणी एकवटल्या आहेत़ याबाबत त्यांनी प्रशासकीय पातळीवर निवेदने तर दिली आहेतच; मात्र ग्रामसभेत ठराव होऊनही दारू दुकान राजरोसपणे सुरूच आहे़ त्यामुळे आता महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालायावर मोर्चा काढून बेमुदत उपोषणाचे अस्त्र उपसले आहे़ कऱ्हाड तालुक्यातील लोकसंख्येने मोठे असलेले एक गाव म्हणजे कार्वे! सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा जपणाऱ्या या गावाने ‘निर्मल ग्राम’ पुरस्कारापाठोपाठ ‘महात्मा गांधी तंटामुक्ती’ पुरस्कारही मिळविला आहे़ पण, तंट्याला कारणीभूत असणारी ‘ती’ बया गावाच्या वेशीवरच उभी आहे़ त्यामुळे गावाच्या लौकिकाला गालबोट लावण्याचे प्रकार होत आहेत़ गावाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा तर नजीकच महालक्ष्मीचे मंदिर आहे़ मात्र त्याला लागूनच असणाऱ्या या ‘मदिरे’च्या मंदिरात सध्या तळीरामांची गर्दी वाढली आहे़ यामुळे ग्रामस्थ व प्रवाशांना तळीरामांकडून त्रास होत आहे़ शिवाय ‘जो दारूत रंगला, त्याचा संसार भंगला’ याची प्रचिती कार्वेत अनेक कुटुंबांना आली आहे़ त्यामुळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारुती जाधव यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी सातारा यांना दारूदुकान तत्काळ बंद करण्याचे निवेदन दिले आहे़ मात्र, त्याहीपुढे जाऊन महिलांनी मोर्चा व उपोषणाचा इशारा दिल्याने प्रजासत्ताकदिनी कार्वेची ‘प्रजा’ नेमके काय करणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे़ (प्रतिनिधी)
तक्रारदारांना दमदाटीचा प्रयत्न
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारुती जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्यापासून संबंधित दुकान मालक अस्वस्थ झाले आहेत़ गुरुवारी सायंकाळी मारुती जाधव एका कामानिमित्त कऱ्हाडला आले असता, काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना एका गाडीत घालून एका हॉटेलमध्ये नेले़ तेथे ‘ही तक्रार मागे घ्या,’ अशी दमदाटीही झाली. मात्र, जाधवांनी प्रसंगावधान ओळखून ‘दोन दिवसांनी बघू,’ असे सांगून काढता पाय घेतला,’ असे जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
राज्यात पहिल्यांदा उभी बाटली मतदानाद्वारे आडवी करण्याचा ऐतिहासिक मान याच कऱ्हाड तालुक्यातील आेंड गावाने मिळविला; पण याच तालुक्यात अशी किती तरी गावे उभ्या बाटलीने आडवी होण्याच्या मार्गावर आहेत, याकडे कोण लक्ष देणार हा खरा प्रश्न आहे़
यांना धाडली निवेदने़़़
‘निर्मल ग्राम व तंटामुक्त’ कार्वे ‘दारूमुक्त’ करावे, यासाठी तंटामुक्तीचे अध्यक्ष मारुती जाधव यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आदींना लेखी निवेदन धाडले आहे़ यात २६ जानेवारीचा अल्टिमेटम देण्यात आला असून, तोपर्यंत तोडगा न निघाल्यास कार्वेतील वातावरण गढूळ होण्याची शक्यता आहे़
कोर्वे येथील संबंधित दारूचे दुकान गावाच्या लौकिकाला गालबोट लावणारे आहे़ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानजीक असणारे हे दुकान छत्रपतींच्या विचाराला छेद देणारे आहे़ संबंधित दुकान तत्काळ न हलविल्यास आंदोलन करणार आहोत़
- संतोष पाटील, राज्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड