शेतकऱ्यांसाठी चिंच झाली गोड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:42 IST2021-03-09T04:42:03+5:302021-03-09T04:42:03+5:30
मलटण : चवीनं खाणाऱ्यांना चिंचेची आंबट, तुरट चव कायम लक्षात राहते. या वर्षी चिंचेच्या झाडांना चांगला मोहोर येऊन ...

शेतकऱ्यांसाठी चिंच झाली गोड!
मलटण : चवीनं खाणाऱ्यांना चिंचेची आंबट, तुरट चव कायम लक्षात राहते. या वर्षी चिंचेच्या झाडांना चांगला मोहोर येऊन चिंचाही मोठ्या प्रमाणात लागल्या आहेत. त्यामुळे फलटण तालुक्यातील फरांदवाडी, वडजल, मलटण परिसरात असणाऱ्या झाडांना चांगला बहर आलेला आहे. चिंच हे हंगामी पीक आहे. डिसेंबर, जानेवारीपासून मार्चअखेरपर्यंत चिंचा झोडपण्याचे काम सुरू असते.
शेताच्या बांधावर, विहिरीकाठी किंवा ओढ्याच्या बाजूने सावलीसाठी लावलेली चिंचेची झाडे चिंचांनी चांगलीच लगडली आहेत. यंदा चिंचेला चांगला भाव मिळत असून, प्रतिक्विंटल आठ ते दहा हजार रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांना आंबट चिंच गोड लागत आहे.
फलटण व परिसरात खास चिंचेचे उत्पादन क्वचितच घेतले जात असले तरी बांधावर लावलेली झाडे शेतकऱ्यांना चांगला फायदा देऊन जात आहेत. मलटण, फरांदवाडी, वडजल, परिसरात पुरंदरमधून व्यापारी येतात व प्रति झाड ठरावीक रक्कम ठरवून व्यवहार करतात तर काही नीरा, वाल्हे येथील व्यापारी वजनावर चिंच विकत घेतात. त्यामुळे चिंच प्रमुख पीक नसले तरी चार-दोन झाडांचेसुद्धा चांगले पैसे होत आहेत. घरखर्चासाठी तसेच बियाणे खतांसाठी पैसे उपलब्ध होत आहेत.
चिंचेपासून विविध खाद्यपदार्थ, औषधे तसेच चिंचोक्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. स्वयंपाकघरात रोज वापरातली गोष्ट म्हणजे चिंच आहे.
चौकट आणि कोट येणार आहे...
०८मलटण