वनहद्दीत घुसणारा वणवा चिमुकल्यांनी रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST2021-03-09T04:41:32+5:302021-03-09T04:41:32+5:30

सणबूर : डोंगरात लागलेला वणवा चिमुकल्यांनी एक-दीड किलोमीटर धावत पळत जाऊन वनहद्दीपासून अवघ्या दोन फुटांवर रोखला. कुंभारगाव विभागातील बोर्गेवाडी-चाळकेवाडी ...

Chimukalya stopped Vanava from entering the forest | वनहद्दीत घुसणारा वणवा चिमुकल्यांनी रोखला

वनहद्दीत घुसणारा वणवा चिमुकल्यांनी रोखला

सणबूर : डोंगरात लागलेला वणवा चिमुकल्यांनी एक-दीड किलोमीटर धावत पळत जाऊन वनहद्दीपासून अवघ्या दोन फुटांवर रोखला. कुंभारगाव विभागातील बोर्गेवाडी-चाळकेवाडी यादरम्यान दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेतून वणव्यापासून वनाची रक्षा करण्याची भावना मोठ्यांसह लहान मुलांमध्येही रुजत असल्याचे दिसून येत आहे.

ढेबेवाडी विभागात वनक्षेत्राला लागूनच असलेल्या मालकी क्षेत्रात लावण्यात येणाऱ्या आगीमुळे वन विभागाची डोकेदुखी वाढली आहे. प्रबोधन व जनजागृतीतून अलीकडे ही समस्या हळूहळू कमी होत आहे. मात्र, ती पूर्णपणे संपलेली नाही. वणवे रोखण्यासाठी आता वन कर्मचाऱ्यांच्या मदतीला जागृत ग्रामस्थही पुढे येत असल्याचे अनेक घटनांतून समोर येत आहे. त्यामध्ये लहान मुलेही मागे राहिलेली नाहीत. दोन दिवसांपूर्वी कुंभारगाव विभागात त्याचा प्रत्यय आला.

बोर्गेवाडी-चाळकेवाडी यादरम्यान असलेल्या डोंगरातील मालकी क्षेत्रात लागलेला वणवा एक-दीड किलोमीटरवरील तलावाकाठी खेळणाऱ्या मुलांनी पाहिला. क्षणाचाही विलंब न लावता धावत पळत जाऊन मुलांनी ते ठिकाण गाठले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी निरगुडीसह अन्य झाडांच्या डहाळ्या घेऊन वणवा विझवला. वनहद्दीपासून अवघ्या दोन फुटांवर वणवा रोखण्यात मुलांना यश आल्याने संभाव्य मोठी हानी टळली आहे. घटनास्थळी प्रकाश बोर्गे, बाजीराव मोरे हे ग्रामस्थही उपस्थित होते. त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

घटनेची माहिती समजताच वनपाल सुभाष राऊत, वनरक्षक सुभाष पाटील, अनिल पाटील, दादा मदने ब्लोअर मशीन घेऊन तत्काळ त्या ठिकाणी पोहोचले. मात्र त्यापूर्वीच मुलांनी वणवा आटोक्यात आणला होता. शाळकरी मुलांमध्ये निर्माण झालेल्या पर्यावरणविषयक जागृतीबद्दल वनविभागाने संबंधित मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

- चौकट

वणवा रोखण्यासाठी विविध उपाययोजना

ढेबेवाडी विभागात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्राचे वणव्यापासून संरक्षण व्हावे, यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. गावोगावी वन विभागाकडून जनजागृती मोहीम आयोजित केली जात आहे. तसेच वन वणवा प्रतिबंध सप्ताहाच्या निमित्ताने गावोगावी विविध कार्यक्रम घेऊन ग्रामस्थ, शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी बांधावरील गवत तसेच इतर कचरा जाळताना काळजी घ्यावी. वणवा लावल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा वन विभागाकडून देण्यात आला आहे.

फोटो : ०८केआरडी०५

कॅप्शन : बोर्गेवाडी, ता. पाटण येथे वनहद्दीत जाणारा वणवा चिमुकल्यांनी रोखला. त्यामुळे वनसंपत्तीची संभाव्य हानी टळली.

Web Title: Chimukalya stopped Vanava from entering the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.