चिमुकल्यांना चक्क अभ्यासाचाच विसर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:26 IST2021-07-08T04:26:25+5:302021-07-08T04:26:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कोविड संसर्गाची बाधा नको म्हणून बच्चे कंपनी शाळेत गेलीच नाही. परिणामी ...

चिमुकल्यांना चक्क अभ्यासाचाच विसर!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कोविड संसर्गाची बाधा नको म्हणून बच्चे कंपनी शाळेत गेलीच नाही. परिणामी ही नुसती लुडबूड घरात राहून चक्क अभ्यास करणंच विसरू लागली आहे. अभ्यास चुकविण्यासाठी एकसे एक भन्नाट कारणं सांगून ऐन शैक्षणिक वर्ष सुरू झालं तरीही सुट्टीचा आनंद घेणारी चिमुरडी पालकांना अस्वस्थ करत आहेत.
कोविड काळात आॅनलाइन शाळा सुरू झाल्याने पूर्वीसारखं आवरून शाळेत जाणं, वर्गात लक्षपूर्वक शिकवलेलं ऐकणं, गृहपाठ करणं ही सवय मोडली आहे. आॅनलाइन वर्ग सुरू असताना घरात अन्य सदस्यांच्या हालचाली विद्यार्थ्यांना विचलित करत आहेत. त्यामुळे त्यांना शिकवलेलं लक्षात राहत नसल्याचं समोर आले आहे. कोविडचा काळ सरेपर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे पालकांनी अधिक लक्ष देणं आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
चौकट :
ही असतात अभ्यास टाळण्याची कारणं :
तुला स्वयंपाकात मदत करतो
झाडांना पाणी घालतो
स्कूलचा ग्रुप बंद झाला. आता उद्याच अभ्यास करू
शिकवलेलं काही कळलंच नाही
आता थोडासा कंटाळा आलाय
थोडं एन्जॉय करू दे
खेळून आलो की अभ्यास करतो
आत्ता एकदम जाम बोरिंग होतंय
मोबाईलची बॅटरीच चार्ज नाही
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची अडचण
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना अवघ्या तीन ते चार वर्षांचाच शाळेचा अनुभव आहे.
गणवेशासह शाळेत जाणं, फळ्यावर शिक्षकांनी शिकवणं, वर्गमित्रांबरोबर दंगा करणं ही शाळेची संकल्पना आहे.
बालवाडी, छोटा आणि मोठा गट या वर्गातील मुलांना गेल्या दोन वर्षांत अभ्यासाचा कसलाच गंध राहिलेला नाही.
अक्षरओळखच्या नावाने ओरड
कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मार्च २०२० पासून शाळा बंद ठेवण्यात आल्या. त्यावेळी छोटा आणि मोठ्या गटात शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणाकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. नेमकं याच दोन वर्गांमध्ये मुलांना अक्षरओळख आणि हस्ताक्षराचा सराव करण्याचे तंत्र शाळांमध्ये शिकविले जाते. आॅनलाईन वर्ग सुरू असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग नोंदविला नाही. जे सहभागी झाले, त्यांनाही उभी आणि आडवी रेष सोडलं तर फारसं ज्ञान अर्जित करता आलं नाही. ही मुलं पहिली दुसरीत गेली तरीही त्यांच्या वाचनासह अक्षरओळखीची ओरड आहे.
मुलांच्या मनात अभ्यासाची धास्ती!
मुलांना शिकविण्याची आवश्यक असणारी शास्त्रीय पध्दत शिकविण्याची कला पालकांमध्ये नाही. त्यामुळे संयम तुटून मुलांवर ओरडणं, त्यांना शिक्षा करणं हे प्रकार घराघरांमध्ये वाढले आहेत. अभ्यासामुळे आपल्याला मानहानीला सामोरे जावं लागतंय, या धास्तीने मुलांच्या मनात अभ्यासाविषयी अधिक भीती बसली आहे.
कोट :
अभ्यास करण्यासाठी वाचणं आणि लिहिण्याएवढचं समजून घेणेही महत्त्वाचे आहे. आॅनलाईन वर्ग सुरू असला तरीही प्रत्येक पालकाकडे स्वतंत्र खोली नाही. एकाच घरात चार वेगवेगळ्या कृती सुरू असताना मुलांचे लक्ष केंद्रित होणे निव्वळ कठीण आहे. त्यामुळे त्यांना कितीही शिकवलं तरी त्याचा विसर पडणं हे स्वाभाविक आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी वेळ काढणं आवश्यक आहेच.
- डॉ. देवदत्त गायकवाड, सातारा
शाळा त्यांच्या पद्धतीने आॅनलाईन वर्ग घेत आहे. पण शाळेत जाऊन गृहपाठ दाखवणं आणि घरी बसून वर्गाच्या ग्रुपवर पाठवणं यात फरक आहे. माझी मुलगी अभ्यास टाळण्यासाठी एकसे एक भन्नाट कारणं शोधते. ग्रुप बंद झालाय आता पाठवून काय उपयोग, असं ती ऐकवते. अनेकदा अभ्यास नको म्हणून घर आवरायलाही तिचा पुढाकार असतो.
- अॅड. नीता फडतरे, सातारा
...........