चिल्लर टंचाईची भिकाऱ्यांनाही झळ!
By Admin | Updated: January 23, 2015 23:40 IST2015-01-23T20:24:26+5:302015-01-23T23:40:10+5:30
दानधर्मातही अडचण : देणारा म्हणतो, ‘दहाची नोट वाटून घ्या’

चिल्लर टंचाईची भिकाऱ्यांनाही झळ!
सातारा : दान देऊन पुण्य कमवायचे ही आपली संस्कृती. परंतु त्या ठिकाणीही आजकाल अडचणी येऊ लागल्या आहेत. एकीकडे मंदिरातून बाहेर पडल्यावर दान मागणारे अनेक आणि दुसरीकडे नाण्यांची टंचाई... अखेर देणारा म्हणतो, ‘दहाची नोट देतो. वाटून घ्या.’गेल्या काही महिन्यांपासून सुट्या पैशांची मोठी चणचण भासत आहे. त्यामुळे इच्छा असूनही भिक्षेकऱ्यांना दान देणे काहींना जमत नाही. दुसरीकडे, मंदिराच्या दारात असंख्य भिकारी रांगेने बसलेले दिसतात. सगळेच दान मागतात. काही भक्तांनी यावर उत्तम तोडगा शोधला आहे. एका भिक्षेकऱ्याजवळ दहाची नोट दिली जाते आणि ‘वाटून घ्या’ असे सांगितले जाते.
शुभकार्य करण्याआधीही अनेकजण दानधर्म करतात. दान केल्याने संभाव्य संकट टळते, असे शास्त्रवचन असल्याने दानाला महत्त्व दिले गेले आहे. दान साधारणत: प्रार्थनास्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी अधिक प्रमाणात दिले-घेतले जाते. प्रार्थनास्थळी भिक्षेकऱ्यांची संख्या जास्त असते. सध्या बाजारात एक, दोन रुपयांत होऊ शकणारे व्यवहार जवळजवळ बंद झाले आहेत. भिकारीही एक रुपया दिल्यास चेहरा आंबट करतात. दुसरीकडे, पाच, वीस आणि पन्नास रुपयांच्या नोटा मिळणे (मिळाल्यास त्या चांगल्या असणे) मुश्किल झाले आहे. भाजीमंडईत दहाच्या नोटांचा तुटवडा जाणवतो. खिशात चिल्लर जवळजवळ नसतेच. भिक्षेकऱ्यांना दान म्हणून सामान्यत: एक, दोन किंवा पाच रुपये दिले जातात. देवाची परडी घेऊन पैसे मागत फिरणाऱ्या, लहान मुलांना काखोटीला घेऊन फिरणाऱ्या महिला अचानक समोर येतात.
खिशात हात घालताच चिल्लर नसल्याचे कळते. अशा वेळी ‘दान विभागून’ ही संकल्पना अनेकांनी जवळ केली आहे. (प्रतिनिधी)
दहा द्या... चिल्लर देतो
काही जण भिकाऱ्यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी खिशात हात घालून ‘सुटे पैसे नाहीत’ असा बहाणा करतात. अशा वेळी ‘दहाची नोट द्या, चिल्लर देतो,’ असे म्हणणारे भिकारीही आता दिसू लागले आहेत. भीक विभागून देताना दहाची नोट आणि समोर भिकारी मात्र १२-१५ असे चित्र असल्यास देणाऱ्याची अडचण होताना दिसत आहे.