मुलं उतरणार ‘स्पर्धे’त!
By Admin | Updated: May 27, 2016 00:02 IST2016-05-26T23:52:55+5:302016-05-27T00:02:23+5:30
विद्यार्थ्यांचा कल : बारावीनंतर अनेकांनी निवडला स्पर्धा परीक्षांचा पर्याय--लोकमत सर्वेक्षण

मुलं उतरणार ‘स्पर्धे’त!
सातारा : आयुष्याला खऱ्या अर्थानं कलाटणी देणारी अन् सर्वच विद्यार्थ्यांना ज्याची धास्ती असते ती बारावीची परीक्षा यशस्वी केल्यानंतर आता विद्यार्थी भविष्याची परीक्षा द्यायला सज्ज झाले आहेत. बारावीनंतर पुढे काय? या प्रश्नावर विद्यार्थ्यांना बोलतं केलं असता मेडिकल, इंजिनिअरींग, स्पर्धा परीक्षा व इतर अशा चार पर्यायांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा हा पर्याय निवडल्याचे समोर आले आहे.
बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचा कल नेमका कशात आहे, याबाबत ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेत असे दिसून आले की, आता अनेक शासकीय क्षेत्रात नोकरभरतीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या माध्यमातून विविध पदे भरली जात आहेत. त्यामुळे नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. साहजिकच स्पर्धा परीक्षांकडे कल वाढला आहे. मेडिकल, इंजिनिअरींग, सी. ए. सी. एस., एम. बी. ए. या शाखेत प्रवेश घेणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे.
स्पर्धा परीक्षाच का?
नोकरीच्या संधी जास्त असल्याने बारावीनंतर गुणवत्ता यादीत येणारे विद्यार्थीदेखील आता स्पर्धा परीक्षेकडे वळू लागले आहेत. इतर शाखेत जाण्यापेक्षा आर्टस्, कॉमर्सची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षा देण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू लागला आहे.
पदवी अन् स्पर्धा
परीक्षांचा अभ्यास एकत्र
कॉमर्स, आर्टस् शाखेत प्रवेश घेऊन पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही करता येऊ शकतो. बारावीनंतर पदवीसाठी तीन वर्षे लागतात. त्यामुळे या कालावधीत शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठीही वेळ मिळू शकतो. पदवी घेतल्यानंतर लगेच स्पर्धा परीक्षा देता येते. त्यामुळे नोकरी मिळविण्याच्या संधी जास्त असतात. म्हणून विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळू लागले आहेत.
वेळ आणि खर्चही वाचतो
बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मेडिकल, इंजिनिअरींग यासारख्या शाखेत प्रवेश घेतात. त्यांची स्वप्नं वेगळी असतात. मात्र, हे शिक्षण घेण्यासाठी खर्च जास्त असल्याने आता अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा पर्याय निवडत आहेत. त्यामानाने रेग्युलर शिक्षणाला फारसा खर्च येत नाही.
स्पर्धेत मुलींचे प्रमाण जास्त
स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण वाढू लागले आहे. विविध क्षेत्रात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून श्रेणी १, २ ची पदे भरली जातात. गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहिल्यास यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. शालेय अभ्यासक्रमात गुंतून राहण्यापेक्षा तो वेळ स्पर्धा परीक्षेसाठी दिल्यास हमखास नोकरी मिळू शकते, हा विश्वास मुलींमध्ये पाहायला मिळतो.