वानराच्या धपक्याचा मुलांनी घेतलाय धसका..!
By Admin | Updated: February 7, 2015 00:09 IST2015-02-06T22:43:20+5:302015-02-07T00:09:43+5:30
पाठीवर उडी मारून वानरे घेतायत चावा; घबराटीचे वातावरण

वानराच्या धपक्याचा मुलांनी घेतलाय धसका..!
वडूज : ‘पळा.. पळा वानरं आली’ म्हणण्यापूर्वीच विद्यार्थी दशेतील मुलांच्या पाठीवर असलेल्या दप्तरावरच झडप मारून त्या मुलांच्या शरीरावर चावा घेऊन वानरांच्या टोळीने वडूज शहरात अक्षरश: धुमाकूळ घातला असून, वानराच्या धपक्याने मुलांनी चांगलाच धसका घेतला असल्याचे सदृश्य चित्र पाहावयास मिळत आहे.सकाळी साडेदहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ मध्ये जाण्यासाठी जय पाटोळे व त्याचा मित्र महंमद मुल्ला (इयत्ता पहिली) हे दोघे दहिवडी-कऱ्हाड या मुख्य रस्त्यावरून जात होते. त्याचवेळी आठ ते दहा वानरे असणारी टोळी येथीलच एका बँकेच्या कठड्यावर बसलेली होती. दरम्यान, एका वानराने जयच्या पाठीवर थेट उडी घेतली. यामध्ये जय रस्त्यावरच कोसळला. रहदारी असणाऱ्या रस्त्यावरच हा थरार सुरू होता. जयच्या पाठीवर दोन-तीन मिनिटे झाली तरी ते वानर त्याच अवस्थेत त्याचा चावा घेण्यासाठी प्रयत्न करीत होते; परंतु शाळेचा युनिफॉर्म असलेली जयची पँट जाड कापडाची असल्यामुळे चावा घेताना वानराला कठीण जात होते. बँकेतील काही लोक व इतर नागरिक धावून आल्यामुळे ते वानर पळून गेले. परंतु जयच्या गुडघ्याला जखम झाली. व त्याच बरोबरीने मांडीलाही त्या वानराचे दात लागले. भयभीत झालेला जय त्या परिस्थितीत घरी न जाता थेट शाळेत गेला. पूर्णपणे गांगरून गेलेला जय व त्याचा मित्र महंमद मधल्या सुटीत पोषण आहार घेत होते. जय मात्र या वानर हल्ल्यामुळे चांगलाच भयभीत झाला होता. प्रत्यक्षदर्शी डॉ. वैभव बेंद्रे जयला दवाखान्यात न्यायचे म्हणून आले; परंतु त्या आधीच तो शाळेत गेला. येथीलच हॉटेलचालक अनिल भोकरे व रवी काळे यांनी जय व त्याच्या मित्रास ‘तुम्हाला घरी सोडतो म्हटले; परंतु त्याही अवस्थेत हे दोघे मित्र ‘जय-वीरू’ शाळेत गेले. (प्रतिनिधी)
याबाबत वनक्षेत्रपाल सुरेश घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता वानर पकडणारे जिल्ह्यात लोक नाहीत. तर वाई येथील ‘मंकी चाचा’ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही नकार दर्शविला. वनविभागाकडे पिंजरा नसून या संदर्भात खर्चाची तरतूद नसल्याचे सांगून घाडगे म्हणाले, ‘याबाबत (खर्चाच्या तरतुदीसाठी) ग्रामपंचायतीला लेखी कळविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
-सुरेश घाडगे, वनक्षेत्रपाल, वडूज