‘अज्ञात’ दंशाने मुले रुग्णालयात
By Admin | Updated: September 20, 2014 00:33 IST2014-09-19T22:53:06+5:302014-09-20T00:33:29+5:30
कांदाटीत घटना : शाळेतच मुलांच्या अंगाची आग; रक्ताचे नमुने पुण्याला

‘अज्ञात’ दंशाने मुले रुग्णालयात
सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यातील एका शाळेतील नववीच्या दहा विद्यार्थ्यांना वर्गातच काहीतरी चावल्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच नेमका प्रकार समजू शकेल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रविणा तानाजी शेलार (वय १४), अंकिता रघुनाथ साळुंखे (१४), सीमा शंकर साळुंखे (१४), सुजाता सुभाष सावंत (१४, सर्व रा. आकलपे, ता. महाबळेश्वर), सीमा ईश्वर कदम (१४, रा. लाजम, ता. महाबळेश्वर), प्रज्योती प्रकाश शिंदे (१४, रा. उचाट, ता. महाबळेश्वर), शैलेश महादेव साळुंखे (१४), राजेश धोंडिबा ढेबे (१४), अनिकेत गोविंद जाधव (१४, रा. आकलपे) अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
वाघवळे येथील मल्लिकार्जुन विद्यालयात हे सर्व विद्यार्थी नववीमध्ये शिकत आहेत. गुरुवारी सायंकाळी सात वाजता शाळेतच जादा तास सुरू असताना सात मुलींना अचानक अस्वस्थ वाटू लागले. अंगाची आग होऊ लागली. त्यामुळे शिक्षकांनी वर्ग बंद करून नेमका काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले. शरीरावर कोठेच जखमा अथवा ओरखडे दिसत नव्हते. तरीही मुलींना काय चावले, हे पाहण्यासाठी शिक्षकांनी ज्या ठिकाणी मुली बसल्या होत्या, त्या बेंचवर तीन मुलांना बसविले. त्या तिन्ही मुलांना शरीराची आग होऊ लागली. नेमके काय चावतेय ते दिसत नव्हते. त्यामुळे शिक्षकही संभ्रमात पडले.
शिक्षकांनी पुन्हा काही ग्रामस्थांना बोलावले. त्यांनाही बेंचवर बसविले. मात्र, ग्रामस्थांना काहीच झाले नाही. परंतु सात मुली आणि तीन मुलांना त्रास होऊ लागला. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना वाघवळे येथील प्राथमिक केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)
शाळेत गेल्यानंतरच त्रास
गुरुवारी सायंकाळी सात वाजता प्रथम सात मुलींना काहीतरी चावले. या सर्व विद्यार्थ्यांवर रात्री वाघवळे येथील प्राथमिक केंद्रात उपचार करण्यात आले. काही वेळातच सर्व मुले ठणठणीत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत आल्यानंतर पुन्हा सर्व मुलांना त्रास होऊ लागला. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे, हे अद्याप कोणाला समजले नाही. मुलांच्या रक्ताचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले आहेत.