जमावासमोर मुलाचा नदीत बुडून मृत्यू
By Admin | Updated: April 21, 2015 01:01 IST2015-04-21T00:41:33+5:302015-04-21T01:01:14+5:30
तारळेतील घटना : बचावासाठी युवकांनी केलेल्या प्रयत्नांना अपयश

जमावासमोर मुलाचा नदीत बुडून मृत्यू
तारळे : तारळी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या संतोष दीपक भांदिर्गे (वय १३) या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, घटनेवेळी नदीपात्रावर धुणे धुण्यासाठी काही महिलांही नदीपात्रावर आल्या होत्या. त्यांच्यासमोरच संतोष गटांगळ्या घेत नदीपात्रात बुडाला. त्यामुळे उपस्थित महिलांनीही मोठा आक्रोश केला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तारळी धरणातून सध्या नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. अशातच तारळे गावातील काही मुले व युवक दररोज सकाळी नदीपात्रात पोहण्यासाठी जातात. सोमवारी सकाळी गावातील संतोष भांदिर्गे हा शाळकरी मुलगा नदीपात्रात पोहण्यासाठी आला होता. त्यावेळी नदीवर कपडे धुण्यासाठी गावातील काही महिलांही आल्या होत्या. संतोष नदीपात्रात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या घेऊ लागला. ही घटना निदर्शनास आल्यानंतर धुणं धुणाऱ्या महिलांनी आरडाओरडा केला. त्यावेळी मिलिंद कुंभार, सचिन राऊत, प्रशांत भांदिर्गे, संतोष दळवी, पोपट गायकवाड, प्रशांत ढवळे, सुनील कुंभार, पिंटू कोळी आदी युवकांनी नदीकडे धाव घेतली. तोपर्यंत संतोष पाण्यात बुडाला होता. युवकांनी नदीपात्रात उडी घेऊन त्याला बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर संतोषच्या नातेवाइकांनीही नदीकडे धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने संतोषला उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. तारळे पोलीस दूरक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच शवविच्छेदनानंतर संतोषचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. (वार्ताहर)
नातेवाइकांचा आक्रोश
संतोष हा गावातीलच हायस्कूलमध्ये सातवीत शिक्षण घेत होता. खेळकर स्वभावामुळे गावातील सर्वांचा तो परिचयाचा होता. संतोषचे वडील दीपक यांचा सलूनचा व्यवसाय आहे. आई गृहिणी असून, त्याला छकुली नावाची धाकटी बहीण आहे. शवविच्छेदनानंतर संतोषचा मृतदेह घरी आणताच आई, वडील, आजी, आजोबांसह इतर नातेवाइकांनी आक्रोश केला.