शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील चौपाळा याठिकाणी एका सोसायटीमध्ये घराचे बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून पाच वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला. पार्थ प्रवीण चांगण (मूळ रा. खामगाव, साखरवाडी ता. फलटण) असे मृत बालकाचे नाव आहे.याबाबत माहिती अशी, शिरवळ परिसरातील चौपाळा याठिकाणी प्रवीण चांगण हे कुटुंबीयांसमवेत राहण्याकरिता आहेत. चौपाळा येथील एका सोसायटीमध्ये सागर कोंडेकर याच्या घराचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान पार्थ हा खेळत असताना पाण्याच्या टाकीमध्ये पडला. ही बाब निदर्शनास येताच त्याठिकाणी असलेल्या रहिवासी प्रसाद कदम, प्रवीण सुर्वे व इतरांनी धाव घेतली.जमा झालेल्यांनी शिरवळ येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची प्रवीण चांगण यांनी शिरवळ पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. शिरवळ पोलिस ठाण्याचे अंमलदार संजय पंडित, पोलिस अंमलदार अजित बोऱ्हाटे तपास करीत आहेत.
खेळताना पाण्याच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू, साताऱ्यातील शिरवळ येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 13:53 IST