लक्ष्मीटेकडीत चिकनगुनियाचा शिरकाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:07+5:302021-02-05T09:17:07+5:30

सातारा : सदर बझार येथील लक्ष्मीटेकडी परिसरातील काही नागरिकांमध्ये चिकनगुनियासदृश लक्षणे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अनेक नागरिकांवर खासगी ...

Chikungunya infiltration in Laxmite! | लक्ष्मीटेकडीत चिकनगुनियाचा शिरकाव !

लक्ष्मीटेकडीत चिकनगुनियाचा शिरकाव !

सातारा : सदर बझार येथील लक्ष्मीटेकडी परिसरातील काही नागरिकांमध्ये चिकनगुनियासदृश लक्षणे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अनेक नागरिकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अनेकजण घरातच उपचार घेत आहे. विशेष म्हणजे स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या पालिकेच्या चाळीतच रुग्णसंख्या अधिक असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.

शहरातील सदर बझार व लक्ष्मीटेकडी परिसरात झोपडपट्ट्यांची संंख्या सर्वाधिक आहे. दाट लोकवस्तीमुुळे या परिसरात पालिकेला स्वच्छता मोहीम राबविणेही जिकिरीचे बनते. उघड्यावरून वाहणारे सांडपाणी, कचऱ्याने भरलेली गटारे, दुर्गंधी यामुळे सदर बझार व लक्ष्मीटेकडी परिसरात साथरोगही वेगाने पसरतात. गेल्या दीड ते दोन वर्षांत या परिसरात चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथील नागरिकांमध्ये ताप, तीव्र सांध्यांच्या वेदना, मळमळ, डोकेदुखी, अंगदुखी आणि थकवा अशी सामान्य लक्षणे आढळून येऊ लागली आहे. ही लक्षणे चिकनगुनियासदृश असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे.

गेल्या महिनाभरात अनेक नागरिकांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. विशेष म्हणजे शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या चाळीतच चिकनगुनियासदृश रुग्णांची संख्या अधिक आहे. ही बाब गंभीर असून, पालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

(चौकट)

यामुळे होतोय फैलाव

चिकनगुनिया विषाणू एडीज इजिप्ती किंवा एडीज अल्बोपिक्टस डासाच्या दंशाने पसरतो. हे मच्छर डेंग्यू आणि झिका देखील प्रसारित करतात. एकदा संसर्ग झाल्यानंतर, लक्षणे दोन ते बारा दिवसांत कधीही दिसू शकतात. सदर बझार परिसरात अस्वच्छता, सांडपाणी व कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे.

(चौकट)

ही काळजी घ्यावी

डासांच्या अळ्या फुलदाण्या, पाण्याची भरलेली पिंपे, नारळाच्या करवंट्यातील पाणी व उघड्या गटारांभोवती वाढतात. माणसांना हे डास चावण्याचे प्रमाण वाढते आणि चिकनगुनिया विषाणूचा प्रसार वेगाने होतो. त्यामुळे घर व परिसराची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. चिकनगुनिया हा आजार अंगभूत रोगप्रतिकारशक्तीमुळे बरा होत असल्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसते. पुरेशी विश्रांती, द्रवरूप आहार आणि वेदनाशामके घेतल्यास रुग्ण लवकर बरा होतो.

(कोट)

गेल्या काही दिवसांपासून सदर बझार, लक्ष्मीटेकडी परिसरात ताप, अंगदुखी, सांधेदुखी, थकवा अशी लक्षणे असणारे रुग्ण आढळून येऊ लागले आहे. हा परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाणी उघड्यावरून वाहते. त्यामुळे डांसांचे प्रमाणही वाढले आहे. पालिकेने स्वच्छता करून औषध फवारणी करावी.

- योगेश जाधव, लक्ष्मीटेकडी

फोटो : ३१ जावेद ०१/२१

लक्ष्मीटेकडी परिसरास सांडपाणी असे उघड्यावरून वाहत आहे. येथील काही नागरिकांमध्ये चिकनगुनियासदृश लक्षणे आढळून आल्याने त्यांच्यावर घरातच उपचार सुरू आहेत. (छाया : जावेद खान)

Web Title: Chikungunya infiltration in Laxmite!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.