मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी कऱ्हाडात
By Admin | Updated: April 21, 2015 01:02 IST2015-04-21T00:43:43+5:302015-04-21T01:02:23+5:30
मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा कऱ्हाड दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी २५ नोव्हेंबर २०१४ रोजी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त ते कऱ्हाडला आले होते

मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी कऱ्हाडात
कऱ्हाड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी, दि. २५ कऱ्हाड दौऱ्यावर आहेत. येथील कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसत आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा कऱ्हाड दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी २५ नोव्हेंबर २०१४ रोजी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त ते कऱ्हाडला आले होते. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून त्यांनी कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांनी केले होते.
भाजपचे डॉ. अतुल भोसले यांनी पदवीदान समारंभाचे औचित्य साधून मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारल्याने भोसले समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कृष्णा उद्योग समूहाच्या आवारात भव्य शामियाना उभारण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने आणखी कोणाकोणाला निमंत्रित केले आहे, याची अधिकृत माहिती अद्याप मिळाली नसली तरी कार्यक्रमाच्या तयारीवरून अनेक दिग्गज कार्यक्रमाला हजेरी लावतील, अशी शक्यता आहे.
दरम्यान, कार्यक्रम जरी शैक्षणिक असला तरी मुख्यमंत्री फडणवीस येणार असल्याने भाजप कार्यकर्तेही सुखावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी त्यांच्याकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)