नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांची साताऱ्यात १४ रोजी निवड

By Admin | Updated: October 6, 2015 00:35 IST2015-10-05T22:59:49+5:302015-10-06T00:35:44+5:30

निवडणूक कार्यक्रम जाहीर : दोन्ही पदांसाठी अनेक नावे आघाडीवर

Chief Election Commissioner, Vice-President, Satara on 14th | नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांची साताऱ्यात १४ रोजी निवड

नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांची साताऱ्यात १४ रोजी निवड

सातारा : सातारच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार बुधवार, दि. १४ आॅक्टोबर रोजी दुपारी २ नंतर या निवडी केल्या जाणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी सातारा विकास आघाडीकडून विजय बडेकर यांचे नाव अंतिम असले तरी उपनगराध्यक्षपदासाठी नगरविकास आघाडीकडून जयवंत भोसले व दीपलक्ष्मी नाईक यांचे नाव चर्चेत आहेत. माजी नगराध्यक्ष सचिन सारस व उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. रिक्त झालेल्या पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि. ९ आॅक्टोबर रोजी सकाळी १० ते २ यावेळेत नगराध्यक्षपदासाठी मुख्याधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करायचा आहे.
त्यादिवशी दुपारी २ ते ४ यावेळेत पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने हे अर्जांची छाननी करून उमेदवारी अर्ज फेटाळलेल्या अर्जदारांची यादी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पालिकेतील नोटीस बोर्डावर लावतील.
फेटाळलेल्या अर्जदारांना दि. १२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अपील करता येईल. सायंकाळी ५ नंतर वैध अर्जदारांची नावे जाहीर केली जातील. दि. १३ रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी सूचनेद्वारे अर्ज मागे घेता येतील. दि. १४ रोजी दुपारी २ वाजता प्रत्यक्ष निवडणूक होईल.
दरम्यान, उपनगराध्यक्षपदासाठी दि. १४ रोजी सकाळी १० ते २ यावेळेत मुख्याधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करायचा आहे.
पीठासन अधिकारी या नामनिर्देशनपत्राची छाननी करतील. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर लगेचच उपनगराध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

नाईकांनाही आशा संधीची
नगरविकास आघाडीमधून उपनगराध्यक्षपदासाठी नगरसेवक जयवंत भोसले यांच्यासोबत नगरसेविका दीपलक्ष्मी नाईक यांचेही नाव चर्चेत आहे. नाईक यांना पालिकेतील कोणतेही सभापतिपद मिळाले नसल्याने त्यांना उपनगराध्यक्षपदाची संधी मिळणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

Web Title: Chief Election Commissioner, Vice-President, Satara on 14th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.