चिडीचूप ‘खाकी’; सावकार ‘खादी’!

By Admin | Updated: November 11, 2014 00:05 IST2014-11-10T21:10:08+5:302014-11-11T00:05:22+5:30

आतबट्ट्याचा व्यवसाय बोकाळला : अनेकांच्या मानगुटीवर ‘हप्त्या’चं भूत; कितीही भरले तरी मुद्दल बाकीच

Chidichoop 'Khaki'; Savarkar 'Khadi'! | चिडीचूप ‘खाकी’; सावकार ‘खादी’!

चिडीचूप ‘खाकी’; सावकार ‘खादी’!

संजय पाटील - कऱ्हाड - अवैध व्यावसायिकांवर ‘खाकी’चा वचक असणे गरजेचे असते. वचक नसेल तर तर दारू, मटका आणि जुगारवाले खाकीला जुमानत नाहीत. सावकारांचंही सध्या तसंच चाललंय. त्यांच्यावर अंकुश नसल्याने ते पोलिसांना भीत नाहीत. उघडउघड त्यांचा आतबट्ट्याचा व्यवसाय चालतोय. एवढंच नव्हे तर एखाद्या प्रकरणात तडजोड करायला ‘खादी’ घालून पोलीस ठाण्यात जाण्यासही ते घाबरेनासे झालेत.
पैशांसाठी अनेकजण सावकाराचा दरवाजा ठोठावतात़ दहा, वीस टक्क्याने त्यांच्याकडून कर्ज उचलतात; पण कालांतराने त्या गरजवंताची स्थिती जळू चिकटलेल्या जनावरासारखी होते़ ‘सावकार’ नावाचे जळू त्या गरजवंताचे पैसे शोषतातच; पण त्याहीपेक्षा त्याचं अन् त्याच्या कुटुंबीयांचं जगणं अक्षरश: मुश्किल करून टाकतात़ गरीब असो अथवा श्रीमंत़, पैशांची गरज सर्वांनाच लागते़ गरिबाला श्रीमंत होण्यासाठी तर श्रीमंताला ‘गर्भश्रीमंत’ होण्यासाठी कायमच पैशांची हाव असते; पण गरजेपोटी सावकारासमोर हात पसरणाऱ्याला आयुष्यातून उठावे लागल्याची उदाहरणे आहेत़ सध्या कऱ्हाडात असे अनेक सावकार वसुलीसाठी सामान्यांच्या मानगुटीवर बसलेत़ सावकारीतले काही ‘मासे’ यापूर्वी पोलिसांच्या गळाला लागले आहेत. त्यातून या रॅकेटचा काही प्रमाणात पर्दाफाशही झाला आहे; पण अटक केलेल्यांव्यतिरिक्त आणखी अनेकजण बेकायदा सावकारी करीत असल्याचे दिसून येत आहे़ सावकारी करणाऱ्यांमध्ये काही ‘व्हाईट कॉलर’वाल्यांचाही समावेश आहे़
खासगी सावकारांनी पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी दलालांची नेमणूक केली आहे़ ज्याला पैशाची गरज आहे, असे सावज शोधायचे अन् त्याला सावकाराच्या दारात नेऊन उभे करायचे, असा दलालांचा व्यवसाय आहे़ त्यापोटी संबंधित दलालाला टक्केवारी दिली जाते़ कर्ज दिल्यानंतर ते वसूल करण्यासाठीही काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांची नेमणूक केली जाते़ हे युवक दर महिन्याला कर्जदाराचा पिच्छा पुरवितात़ व्याजापोटी ते कर्जदाराकडून अव्वाच्या सव्वा पैसे वसूल करतात़ कर्जदाराने कितीही पैसे दिले तर हिशोबामध्ये ते पैसे व्याजापोटीच गृहीत धरले जातात़ कर्जदाराच्या नावासमोरील ‘मुद्दल’चा आकडा कधीच कमी होत नाही़
कऱ्हाडात खासगी सावकारी चालत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यावेळी पोलिसांकडून कारवाईही करण्यात आली आहे. मात्र, सावकारीतल्या मोठ्या माशांपर्यंत पोलीस कधीही पोहोचलेले नाहीत. शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी मुरलीधर मुळूक कार्यरत असताना त्यांनी काही सावकारांना ‘खाकी’चा हिसका दाखवला होता. मात्र, त्यानंतर कधीच कोणत्याही अधिकाऱ्याने सावकारीबाबत कडक धोरण अवलंबले नाही. त्यामुळे सावकारांना सध्या मोकळे रान मिळाल्याची परिस्थिती आहे.
कोणीही उठतो अन् सावकार बनतो, अशीच कऱ्हाडची अवस्था आहे. या व्यवसायाबाबत सध्या उघडउघड चर्चा होतायत. पोलिसांपर्यंतही त्या पोहाचत असाव्यात. मात्र, त्याकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष केले जाते. पोलिसांकडूनच ‘क्लीन चिट’ मिळत असल्याने असे सावकार सध्या मोकाट सुटलेत. कधीकधी एखाद्या प्रकरणात तडजोड करण्यासाठी हे सावकार पोलीस ठाण्यातही जातात. आवश्यक तशी ‘सेटलमेंट’ करून पोलीस ठाण्यातून ते रूबाबात बाहेरही पडतात, अशी परिस्थिती असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

अशी चालते
सावकारी...
१खासगी सावकारकर्जदाराकडून सुरूवातीला कोरे धनादेश अथवा वाहनांची कागदपत्रं ताब्यात घेतात़
२कर्ज देत असतानाच संबंधित रकमेतून पहिल्या हप्त्यापोटी रक्कम काढून घेतली जाते़ मात्र, व्याज मूळ रकमेप्रमाणेच वसूल केले जाते़
३एखाद्या महिन्यात कर्जदाराने व्याज दिले नाही तर तेथून पुढे दरदिवसाला मुद्दल व व्याजाच्या रकमेवरही व्याज लावले जाते़
४खासगी सावकारांचे व्याजाचे दर वेगवेगळे आहेत. काही सावकार दहा टक्क्याने तर काहीजण पंचवीस टक्क्यापर्यंत व्याज आकारतात़

हे कोण करणार?
कऱ्हाडातील काहीजणांकडे सावकारीचा परवाना असल्याचे सांगितले जाते. मात्र, असे परवानाधारक सावकार किती, हेच कोणाला माहीत नाही. तसेच ज्यांच्याकडे परवाना आहे ते नियमाप्रमाणे सावकारी करतात का, हाही प्रश्न आहे. काहीजणांनी ‘फायनान्स’च्या नावाखाली खासगी सावकारी सुरू केली आहे. नियमबाह्य व बेकायदा सावकारी करणाऱ्यांना पोलिसांनी चाप लावणे गरजेचे आहे.

Web Title: Chidichoop 'Khaki'; Savarkar 'Khadi'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.