चिमुरड्यांनी गोळा केला तब्बल १०० किलो कचरा
By Admin | Updated: October 9, 2015 21:02 IST2015-10-09T21:02:56+5:302015-10-09T21:02:56+5:30
१८० विद्यार्थ्यांचा सहभाग : माळजाई मंदिर परिसराने टाकली कात

चिमुरड्यांनी गोळा केला तब्बल १०० किलो कचरा
फलटण : लायन्स क्लब आॅफ फलटणच्या वतीने आयोजित सेवा सप्ताहादरम्यान ब्रिलियंट अॅकॅडमीच्या दुसरी ते चौथीच्या १८० विद्यार्थ्यांनी सलग दोन तास माळजाई उद्यान व मंदिर परिसराची स्वच्छता करून सुमारे १०० किलो कचरा गोळा केला.
लायन्स क्लबच्या सेवा सप्ताहात सक्रिय सहभागी झालेल्या या बालचमूंचे विविध स्तरांवरून कौतुक करण्यात आले. सलग दोन तास न थकता या बालचमूंने केलेली स्वच्छता आणि जमा केलेला कचरा संपूर्ण शहरभर कौतुकाचा विषय ठरला.
ब्रिलियंटचे प्राचार्य पांडुरंग पाटील, विभागप्रमुख हेमलता बनकर व त्यांच्या सहकारी तीन शिक्षकांनी या विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेचे काम करून घेऊन त्यांना समाजकार्याची गोडी लागेल, यासाठी प्रवृत्त केले. हे काम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कामकाज संपल्यानंतर सर्व विद्यार्थी शिस्तीने एका ओळीत विद्यालयाकडे परतले. ‘ग्रीन सिटी, क्लिन सिटी, स्वच्छ भारत, सुंदर भारत’ अशा घोषणांचे
फलक घेवून संदेश दिला.
क्लबचे अध्यक्ष राजेश शहा व पदाधिकारी आणि लायन्स मेंबर्स तसेच ब्रिलियंटचे कार्यकारी संचालक रणजितसिंह भोसले उपस्थित होते.
बालचमूंचे सर्वांनी कौतुक
केले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी दिला संदेश
लहान मुलांना योग्य वयात सामाजिक भानाचे शिक्षण दिले तर ते उत्कृष्टपणे काम करू शकतात, असा संदेश स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने या मुलांनी दिला.