छत्रपतींच्या जयघोषात दरबार मिरवणूक !

By Admin | Updated: April 22, 2015 00:30 IST2015-04-21T22:51:32+5:302015-04-22T00:30:22+5:30

‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर : हजारोंची उपस्थिती; ढोलताशे, झांजपथक, मर्दानी खेळांचा सहभाग

Chhatrapati Chhatrapati Darbar procession! | छत्रपतींच्या जयघोषात दरबार मिरवणूक !

छत्रपतींच्या जयघोषात दरबार मिरवणूक !

कऱ्हाड : फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण, ढोलताशांचा दणदणाट, ‘जय शिवाजी, जय भवानी’चा गजर आणि झांज पथकाचा ठेका अशा उत्साही वातावरणात मंगळवारी सायंकाळी शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची दरबार मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो युवकांनी केलेल्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पारंपारिक पोषाखाबरोबरच भगवे फेटे परिधान करून मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले युवक, युवती व महिला उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू एकता आंदोलनच्यावतीने मंगळवारी सायंकाळी दरबार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहरातील सोमवार पेठेमध्ये असलेल्या पांढरीचा मारूती मंदिरपासुन या मिरवणुकीला प्रारंभ झाला. तेथुन कन्या शाळा, चावडी चौकमार्गे ही मिरवणुक मुख्य बाजारपेठेतून दत्त चौकाकडे मार्गस्थ झाली. लेझीम पथक, झांज पथक, ढोल ताशे पथक मिरवणुकीच्या अग्रभागी होते. यावेळी चौकाचौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ऐतिहासिक पोषाख परिधान करून घोड्यावर स्वार झालेले शस्त्रधारी मावळे, युध्दकलेची प्रात्यक्षिके तसेच चित्तथराथरक कसरती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. गडांच्या प्रतिकृती काही चित्ररथांमध्ये तयार करण्यात आल्या होत्या.
या मिरवणूकीत २५ पेक्षा जास्त सार्वजनिक मंडळांनी आपल्या देखाव्यांचे रथ सहभागी केले होते. पाटण कॉलनीतील शिवाजी गणेश क्रीडा मंडळ व श्री साई दत्त नवरात्र उत्सव मंडळांतर्फे दरबार देखावा, प्राणी वाचवा असा संदेश देणारा देखावा सादर करण्यात आला. चावडी चौक, आझाद चौक, पावसकर गल्ली, मंडई परिसर, नुतन मराठी शाळा परिसर, महिला महाविद्यालय, पे्रमलाताई चव्हाण तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसर, प्रीतिसंगम बाग परिसर आदी ठिकाणच्या सार्वजनिक मंडळांकडून आकर्षक देखावे मिरवणूकीमध्ये सहभागी करण्यात आले
होते.
मिरवणुक मार्गावर ठिकठीकाणी रांगोळी काढण्यात आली होती. रोषणार्इंनी सजवण्यात आलेले देखाव्याच्या रथांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. (प्रतिनिधी)


पताकांनी वाढविली शोभा
दत्तचौकातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हजारो शिवसैनिकांनी अभिवादन केले. मुख्य रस्ते आकर्षक भगव्या रंगाच्या पताकांनी सुशोभीत करण्यात आले होते.



उंच मुर्तींनी वेधले लक्ष
मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांसह श्री रामाची सुमारे वीस फुट उंच मुर्ती सहभागी करण्यात आली होती. या मुर्तींनी उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच पालखीचे दर्शन घेण्यासाठीही नागरीकांनी गर्दी केली होती. मिरवणुकीत गजा ढोल पथकही सहभागी करण्यात आले होते. या पथकाच्या दणदणाटाने परिसर दणाणून सोडला.

Web Title: Chhatrapati Chhatrapati Darbar procession!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.