खंबाटकी बोगद्याजवळ रसायनाचा टँकर पलटी
By Admin | Updated: November 3, 2016 23:28 IST2016-11-03T23:28:15+5:302016-11-03T23:28:15+5:30
टँकरचालक जखमी

खंबाटकी बोगद्याजवळ रसायनाचा टँकर पलटी
खंडाळा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या ‘एस’ वळणावर रसायनाने भरलेला टँकर पलटी झाला. त्यामुळे त्याला गळती लागली असून, पोलिसांनी सावधानता बाळगत घटनास्थळी दोन अग्निशमन बंब तयार ठेवले होते. या अपघातात टँकरचालक जखमी झाला.
याबाबतची माहिती अशी की, महाड येथील औद्योगिक वसाहतीतून ज्वालाग्राही रसायन घेऊन टँकर (एमएच ०४ डीएस ४०५६) हैद्राबादकडे निघाला होता. खंबाटकी बोगदा ओलांडून बेंगरुटवाडीजवळ असलेल्या ‘एस’ वळणावर टँकर आला असता ब्रेक न लागल्याने टँकर लोखंडी ग्रीलला धडकला. त्यानंतर दोन ते तीन पलट्या घेत टँकर सुमारे दोनशे फूट लांब सेवा रस्त्यावर जाऊन पलटी झाला. या अपघातात टँकरचालक जखमी झाला. त्याला लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
अपघातानंतर टँकरमधील ज्वालाग्राही रसायन सेवा रस्त्यावरून वाहू लागले. पेट्रोलपेक्षा अधिक ज्वालाग्राही रसायन असल्याने पोलिसांनी तातडीने भुर्इंज व पाचगणी येथील अग्निशमन बंब बोलाविले. रसायनाचा हवेशी संपर्क आल्यानंतर त्याची वाफ होत होती. यासंदर्भात अनर्थ टाळण्यासाठी रसायन सुरक्षारक्षकाला बोलविले होते. दरम्यान, दुसरा टँकर बोलावून मोटारच्या साह्याने रसायन त्यात भरले जात आहे. (प्रतिनिधी)