हिरव्या झाडांना ‘केमिकल डोस’
By Admin | Updated: May 25, 2016 23:31 IST2016-05-25T22:52:12+5:302016-05-25T23:31:50+5:30
वाई-पसरणी : वृक्षांना लावली जातेय आग; विघ्नसंतोषींकडून पर्यावरणावर घाला

हिरव्या झाडांना ‘केमिकल डोस’
पांडुरंग भिलारे -- वाई -पाचगणी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा असणारे शेकडो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. काही विघ्नसंतोषी व्यक्तींकडून या झाडांच्या बुंध्यात केमिकल टाकून झाडे पेटवून दिली जात आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे वृक्षांचे अस्तित्व धोक्यात आले असून, पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
वाई-पाचगणी मार्गावर विविध प्रकारांची झाडे आहे. यापैकी काही झाडे तब्बल ५० ते ६० वर्षांपूर्वीची आहेत. गेल्या महिन्यात डोंगरांवर वणवा लावण्याचे प्रकार वाढले होते. हे प्रकार बंद होताच विघ्नसंतोषींनी जुन्या वृक्षांना लक्ष केंद्रित केले आहे. झाडांच्या बुंध्यात विशिष्ट प्रकारचे केमिकल टाकून ही झाडे पेटवून दिली जात आहे. काही दिवसांपूर्वी वाई-पाचगणी मार्गावर एक वृक्ष पेटवून देण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच वाईतील भालचंद्र मोने, नागेश मोने, दिलीप डोंबोलीकार, प्रशांत डोंगरे, महेश इनामदार, उदय गांधी या पर्यावरणप्रेमींनी झाडाच्या बुंध्यात लागलेली आग विझवून झाडांना जीवदान दिले.
संबंधित विभागाने गैरकृत्य करणाऱ्या समाजकंटाकांना शोधून कडक शासन करण्याची मागणी करण्यात आली. सध्या झाडे तोडण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्याने जंगल संपत्ती नष्ट होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, त्याचा परिणाम पर्जन्यमानावर होताना दिसत आहे.
- पी. एस. वाडकर,
पर्यावरणप्रेमी
वेळीच प्रबोधन झाले नाही तर हे दुर्दैवी प्रकार दिवसेंदिवस वाढतच राहणार आहेत. वन व बांधकाम विभाग यांनी एकत्रितपणे या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. वन विभागाचे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे ब्रीद वाक्य सत्यात उतरविण्याची आवशकता आहे.
- मकरंद शेंडे,
समूह संस्था, अध्यक्ष