हिरमुसलेले चेहरे अन् आनंदाचा जल्लोष !

By Admin | Updated: April 25, 2015 00:01 IST2015-04-24T23:58:46+5:302015-04-25T00:01:33+5:30

धाकधुकीचा शुक्रवार : उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीही इच्छुकांची रांग

Cheerful faces and joy! | हिरमुसलेले चेहरे अन् आनंदाचा जल्लोष !

हिरमुसलेले चेहरे अन् आनंदाचा जल्लोष !

सातारा : जिल्हा बँक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने शुक्रवारी उमेदवारांची जणू अग्निपरीक्षाच घेतली. उमेदवारीची घटिका जशी समीप येईल, तशी या अग्निपरीक्षेचे दिव्य अनेकांना भावनाविवश करून गेले. उमेदवारी मिळालेल्या चेहऱ्यांवरचा आनंद ओसंडून वाहत होता, तर न मिळाल्याने हिरमुसलेले आणि बंडाच्या पवित्र्यातील लालबुंद भडकलेले चेहरे असे संमिश्र चित्र एकाचवेळी पाहायला मिळाले.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानात झालेल्या या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या समर्थकांची कार्यकर्त्यांची मोठी गर्दी याठिकाणी जमलेली होती. आलिशान गाड्याही याठिकाणी पार्क केल्या गेल्या होत्या. या निवासस्थानातील एका खोलीत रामराजे, लक्ष्मणतात्या, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. प्रभाकर घार्गे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर या दिग्गज मंडळींनी सकाळपासूनच बँकेच्या उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेवेळी इतर कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. निवडणुकीसाठी इच्छुक महिला व त्यांच्या कार्यकर्त्या एका दालनात प्रतीक्षा करत होत्या.
इतर दालनांमध्ये कार्यकर्ते व इच्छुक मंडळी ही चर्चा थांबण्याची वाट पाहात होते.
एका-एका मतदारसंघातील उमेदवारी वाटपाबाबतचे निर्णय जसे होऊ लागले, तसे कार्यकर्त्यांच्या हालचाली वाढल्या. राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झालेली मंडळी विरोधातील इच्छुक उमेदवारांची मनधरणी करण्यात गुंतले. तर काही जणांनी बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न सुरू केले. आमदारांनी तालुकावार उमेदवारांशी चर्चा करून इच्छुकांची मनधरणी सुरू केली. जे इच्छुक जास्त नाराज होते. त्यांना दुसरीकडे संधी देण्याचे ‘शब्द’ही दिले जात होते.
काही उमेदवार पक्षाच्या निर्णयावर नाराज होऊन रागाने निघूनही गेले. त्यांची मनधरणी करण्याचेही प्रयत्न सुरू होते. (प्रतिनिधी)
शंभूराज चे कार्यकर्ते रामराजे-लक्ष्मणतात्यांच्या भेटीला
- पाटण सोसायटी मतदारसंघात आ. शंभूराज देसाई यांनी विक्रमसिंह पाटणकर यांच्याविरोधात दंड थोपटले होते. याठिकाणी घमासान होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती; परंतु आ. शंभूराज देसाई यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन पाटणकरांना सुखद धक्का दिला. यानंतर शंभूराज गटाचे काही कार्यकर्ते जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानात बसलेले राष्ट्रवादीचे नेते रामराजे, लक्ष्मणतात्या यांना भेटून निघून गेले.
- बँकेचे उपाध्यक्ष रवींद्र पवार व संचालक विश्वासराव निंबाळकर यांनी खरेदी विक्री संघातील आपले अर्ज काढून घेतल्याने लक्ष्मणतात्या बिनविरोध झाले. खा. उदयनराजेंचे समर्थक बाबासो घोरपडे यांनी सोसायटी मतदारसंघातील अर्ज काढल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले बिनविरोध झाले. आ. जयकुमार गोरे गटाच्या संतोष पवार यांनी उमेदवारी मागे घेतल्याने आ. प्रभाकर घार्गे बिनविरोध झाले.
रवींद्र कदमांचा आग्रह ठरला फोल
बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष रवींद्र कदम यांनी स्वत:च्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली; मात्र त्यांच्या पत्नी जयश्री कदम यांना महिला राखीवमधून उमेदवारी देण्यात आल्याची बातमी आमदारांच्या बैठकीतून बाहेर आली. मात्र, त्यानंतर शिवेंद्रसिंहराजेंच्या दुसऱ्या समर्थक देगावच्या कांचन साळुंखेंचे नाव घोषित करण्यात आले. यानंतर नेत्यांचे आदेश पाळायलाच पाहिजेत, असं म्हणत रवींद्र कदम तिथून निघून गेले.
दिग्गज उमेदवारही ताटकळले
राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींची सकाळपासून सुरू असलेल्या या बैठकीतून निर्णय कधी येईल, यासाठी अनेकजण ताटकळत बसले होते. सकाळपासून दुपारपर्यंत एक-एक करत निर्णय येत होते. त्यात राजेश पाटील-वाठारकर, विक्रमबाबा पाटणकर, चंद्रकांत जाधव या दिग्गजांनाही ताटकळत राहावे लागले.
 

Web Title: Cheerful faces and joy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.