कऱ्हाडमधील टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत आरोपपत्र
By Admin | Updated: December 10, 2014 23:56 IST2014-12-10T22:08:06+5:302014-12-10T23:56:04+5:30
मयूर गोरे खूनप्रकरण : गुंडदीपक पाटील याच्यासह सहा संशयित आरोपींचा समावेश

कऱ्हाडमधील टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत आरोपपत्र
कऱ्हाड : मयूर गोरे खूनप्रकरणी ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गुंड दीपक पाटील टोळी विरुद्ध पुण्याच्या विशेष न्यायलयाच्या न्या. प्राची कुलकर्णी यांच्यासमोर काल, मंगळवारी दोषारोपपत्र सादर करण्यात आले. सहाजणांचा या टोळीत समावेश असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांनी दिली.
वैभव रमेश माने (वय २५, रा. कार्वेनाका, कऱ्हाड), दीपक भीमराव पाटील (३०, रा. आरळे, ता. पन्हाळा, सध्या रा. नांदलापूर, कऱ्हाड), श्रीयाल ऊर्फ गोट्या भिमराव धेंडे (२३, रा. वालनेसवडी, ता. मिरज), अनिल तानाजी माळी (२०, रा. कालेटेक, ता. कऱ्हाड), सागर खुबू पवार (२३, रा. लमाणतांडा, इस्लामपूर) व अभिजित दत्तात्रय विभुते (३४, रा. कालेटेक) अशी ‘मोक्का’ लावलेल्या आरोपींची नावे आहेत.
जखिणवाडी येथे ९ जून २०१४ रोजी मयूर मोहन गोरे या युवकाचा गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला होता. नातेवाईक महिलेशी असलेल्या मैत्रीमुळे आपली बदनामी होईल, या भीतीपोटी वैभव माने याने सुपारी देऊन हा खून केला असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार १३ जून रोजी वैभव मानेला अटक करण्यात आली. त्यानंतर कुख्यात गुंड दीपक पाटील याच्यासह आणखी चारजणांना अटक झाली.
दीपक पाटीलच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यामार्फत कऱ्हाड पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला. पोलीस महानिरीक्षकांनी या प्रस्तावाला मान्यता देऊन ११ सप्टेबर रोजी या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली. त्याचा तपास पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांच्याकडे देण्यात आला.
घट्टे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार एस. ए. खान, हवालदार सरदार नायकवडी, शशिकांत काळे यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासादरम्यान सर्व आरोपींची पार्श्वभूमी, त्यांच्यावर दाखल असणारे पूर्वीचे गुन्हे तसेच शंभरहून अधिक साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. अपर पोलीस महासंचालक के. एल. बिष्णोई यांनी तपासाची छाननी करून ८ डिसेंबर रोजी या गुन्ह्णात ‘मोक्का’ कायद्यांतर्गत दोषारोपपत्र सादर करण्यास तपास पथकाला परवानगी दिली. त्यानुसार उपअधीक्षक घट्टे यांच्यासह पथकाने मंगळवारी, दि. ९ पुणे-शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयाच्या न्य. प्राची कुलकर्णी यांच्या न्यायालयात या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत दोषारोपपत्र सादर केले. (प्रतिनिधी)
‘मोक्का’अंतर्गत दुसरी कारवाई
सातारच्या पोलीस अधीक्षकपदी डॉ. अभिनव देशमुख रुजू झाल्यापासून जिल्ह्यातील ‘मोक्का’ची ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी दहिवडी येथील एका टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचेही उपअधीक्षक मितेश घट्टे यांनी आज येथे स्पष्ट केले.