चोपाळा वळण पुन्हा ठरतेय धोकादायक
By Admin | Updated: January 2, 2015 23:58 IST2015-01-02T21:09:03+5:302015-01-02T23:58:44+5:30
पुणे-बंगलोर महामार्ग : रस्ता दुरुस्तींचे सूचना फलकांचीच अडचण

चोपाळा वळण पुन्हा ठरतेय धोकादायक
शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीमधील चोपाळा याठिकाणी तयार करण्यात आलेले अशास्त्रीय वळण अपघातांचे माहेरघर बनले आहे. वाहनचालकांबरोबर प्रवाशांचे जीव धोक्यात आहे. तर जिल्हाधिकारी यांच्या आदेशालाही संबंधितांनी केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे.पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सध्या शिरवळ परिसरात काम सुरू आहे. मात्र, संबंधित महामार्गाचे काम घेतलेल्या ठेकेदाराकडून अतिशय संथगतीने सुरू आहे. सध्या ठेकेदाराकडून चोपाळा याठिकाणी पुलाचे काम सुरू असल्याने याठिकाणी पुणेकडून साताराकडे व साताराकडून पुणे बाजूकडे वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र, हे करीत असताना संबंधित विभागाकडून याठिकाणी कोणतीही सुरक्षेची खबरदारी घेण्यात आलेली नाही. याठिकाणी लावण्यात आलेले बोर्डही असून अडचण नसून खोळंबा, असे लावण्यात आलेले आहेत. तर रस्ता दुभाजकाच्या ठिकाणी अर्धवट अवस्थेमध्ये खोदकाम ठेवण्यात आले आहे. तर याठिकाणी करण्यात आलेले डांबरीकरणही उखडून याठिकाणी खड्डे पडल्याने येथे वारंवार अपघात होताना दिसत आहे. मात्र, पोलिसांनी व नागरिकांनी याबाबतची संबंधितांना कल्पना देऊनही याठिकाणी संबंधितांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिलेल्या आदेशालाही ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याठिकाणी खंडाळासारखे अपघात झाल्यानंतर संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जागे होणार का,असा प्रश्न वाहनधारकांतून होत आहे. त्यामुळे याठिकाणी कोणी लक्ष देणार आहे का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. (प्रतिनिधी)
ठेकेदाराचा गलथान कारभार
शिरवळ, ता. खंडाळा येथील चोपाळा या ठिकाणी ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून सध्या पुलाचे काम जोरात सुरू आहे. मात्र, त्यांच्याकडून सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने याठिकाणी दररोज दोन अपघांत घडत आहेत. याबाबत ठेकेदार अधिकाऱ्यांना पोलीस व नागरिकांनी कळवूनही त्याकडे पाट्या टाकण्याशिवाय कोणतेही काम करताना दिसत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांची जीव धोक्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ठेकेदाराकडून चोपाळा या ठिकाणी अशास्त्रीय वळण देण्यात आल्याने या ठिकाणी दररोज अपघाला निमंत्रण मिळत आहे. मात्र, संबंधितांकडून याठिकाणी दुर्लक्ष करण्यात येत असून, टोल मात्र भरमसाठ घेतला जात आहे.
सलीम काझी, उद्योजक, शिरवळ
ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी जिल्हाधिकारी यांचे आदेश न मानता मनमानी कारभार सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता संबंधितांकडून कारभार सुरू असल्याने या ठिकाणी अपघात होताना दिसत आहेत. यासाठी ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी.
- महादेव कांबळे, तालुका उपाध्यक्ष,
भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास, खंडाळा तालुका