सातारा : खटाव - माण तालुक्यासाठी नवसंजीवनी ठरणारा जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजना अनेक छोट्या मोठ्या अडचणींमुळे रखडत होता. कधी जलआयोगाची परवानगी नाही तर कधी रेल्वे विभागाची परवानगी न मिळण्यामुळे काम पूर्ण होत नव्हते. अखेर या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजना असे नाव देण्यात आले आणि चक्क अडचणीतील परवानग्याही मिळत गेल्या.
आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महत्वाची घटना म्हणजे रेल्वेचा ट्रँक उचलून बाजूला करण्यात आला. केवळ योजनेचे नाव बदलल्याने हा झालेला बदल सर्वांसाठीच आश्चर्यकारक असला तरी दुष्काळी भागातील लोकांसाठी लाभदायकच आहे.माण - खटावमधील दुष्काळी भागातून शेतकऱ्यांचे कित्येक वर्षांचे स्वप्न साकार होताना दिसत असून अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजना याचे नामकरण गुरवर्य लक्ष्मणरावजी इनामदार उपसा जलसिंचन योजना असे करण्यात आले आणि या योजनेचे महत्व वाढले.
सध्या या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती लक्ष्मणराव इनामदार लोक कल्याण चँरिटेबल ट्रस्ट खटाव यांच्यावतीने देण्यात आली आहे.जिहे कठापूर येथील ( बँरेज ) बंधाऱ्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून या योजनेच्या पंप हाऊसचे काम सुद्धा पूर्णत्वास गेले आहे.
जिहे कठापूर ते नेर धरण संपूर्ण २३ किलोमीटर पाईपलाईन वर्धनगड घाट बोगद्यासह १०० टक्के पूर्ण झाली आहे. या योजनेस आवश्यक असणारा ४० केव्हीचा विद्युत पुरवठा प्राधान्याने मंजूर करण्या येऊन तोही अंतिम टप्प्यात आहे. पाईपलाईन टेस्टिंग पूर्ण झाले असून त्या संदर्भातील अडचणी पूर्ण करण्यात आल्या आहेत.रेल्वे क्रॉसिंगच्या अडचणीमुळे लोहमार्गाखालून पाईपलाईन टाकणे अडचणीचे ठरत होते. पुणे - मिरज लोहमार्ग बंद करुन क्रॉसिंग करता येत नव्हते. त्यासाठी विशेष परवानगीची गरज होती. अखेर लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चँरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे पुढाकार घेऊन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या मंत्रालयासमोर केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामाला मंजूरी मिळाली आणि १ जून ते १५ जून या कालावधीत आवश्यकतेप्रमाणे लोहमार्ग बंद करून काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पातील शेवटची अडचणही दूर झाली आहे. त्यासाठी संपूर्ण ट्रँकच उचलून बाजूला करण्यात आला आहे.
अत्यंत अवघड असे काम पण मनात आणले तर काय होऊ शकते याचे प्रत्यंतर यातून मिळते. गेली ५० वर्षे या भागात पाणी येणार म्हणून वाट पाहणाऱ्या जनतेसाठी आता पाणी येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असून येरळा नदी लवकरच वाहती होईल असा विश्वास आहे.जिहे-कठापूर योजनेच्या पूर्ततेसाठी गोगावलेवाडीजवळ पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून रेल्वे ट्रक उचलूनच बाजूला ठेवण्यात आला आहे. (छाया : केशव जाधव)